साळशी येथे भल्ली भल्ली भावई उत्सव जल्लोषात व उत्साहात

शिवकालीन परंपरा लाभलेला उत्सव

राजेंद्र साटम (शिरगाव )
ढोलताशांच्या गजरात व भल्ली भल्ली भावयच्या जल्लोषात शिवकालीन परंपरा लाभलेला भावई उत्सव देवगड तालुक्यातील साळशी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आषाढ महिन्याच्या कर्क संक्रातीच्या दिवशी भावई उत्सव साजरा करण्यात येतो. श्री सिद्धेश्वर देवालयासमोर भावई देवी असून तीचा हा उत्सव असतो.या दिवशी सकाळी भावई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून देवीला नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यानंतर दुपारी बारा पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र जमून भावई देवीकडे या उत्सवाला सुरवात करून श्री पावणाई देवालयासमोर ढोल ताशाच्या गजरात व भल्ली भल्ली भावईच्या जल्लोषात भावई खेळली जाते.

यामध्ये लहानथोर मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी होतात. यावेळी एकमेकास चिखल लावला जातो. तसेच होळदेव (मोठा दगड ) दोन्ही हाताची योग्य पकड देऊन वर उचलून शक्ती प्रदर्शन केले जाते. त्यानंतर जमिनीत (चिखलात ) पुरण्यात आलेला नारळ हस्त कौशल्याने काढण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसतात. त्याला सापड खेळणे असे म्हणतात.
त्यानंतर सर्वजण चौऱ्याऐंशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम करतात. यानंतर पुन्हा सर्वजण श्री पावणाई देवालया समोर एकत्र येऊन काल्पनिक शिकारीचा खेळ खेळला जातो. त्यानंतर शिवकला (अवसर) काढण्याची कला सादर करतात.या शिवकलेकडे शिकार मानवून शिकारीचे मुंडके (प्रतिकात्मक आंब्यांचा टाळ) ढोलताशाच्या गजरात मिराशी कुटुंबियांकडे नेला जातो. तिथे त्याची पूजा करून भोजनाचा कार्यक्रम होतो. या उत्सवापासून श्री पावणाई देवीच्या वार्षिक उत्सवाला सुरुवात होते.या दिवशीच्या पूर्वसंध्येला देसरुढ काढण्यात येते.शेती हंगाम असून देखील शेतकऱ्यांना विरंगुळा व आनंद देणारा भावई उत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात येतो.