प्राथमिक शिक्षक समितीच्या शिपोशी व भांबेड प्रभागाचा विभाग स्तरीय स्नेह मेळावा संपन्न

लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा लांजाच्या वतीने शिपोशी व भांबेड प्रभागाचा विभाग स्तरीय स्नेह मेळावा बुधवारी उत्साहात संपन्न झाला.

शिक्षक समितीचे मार्गदर्शक,सल्लागार कै.रा.ग.पवार गुरुजी यांच्या निवासस्थानी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला कोषाध्यक्ष सुदेश आयरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर सरचिटणीस दिनेश झोरे यांनी संघटनेची ध्येय धोरणे व संघटना का असावी याबाबत उपस्थित सर्व सभासदांना मार्गदर्शन करताना नवनियुक्त शिक्षक यांच्या सहकार्याने मिशन शिष्यवृत्ती हा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम समितीच्या माध्यमातून राबवण्याचा मानस व्यक्त केला. त्याचप्रमाणे संच मान्यता,आंतरजिल्हा बदली पोर्टल,वैद्यकीय देयके,ना परतावा फंड प्रस्ताव याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तालुका नेते तुकाराम कोलापटे यांनी संघटनेची ध्येय धोरणे विशद केली.

यावेळी मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष दिलीप दिवाळे यांनी सांगितले की, प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक २३ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा लांजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच या महिन्याच्या अखेरीस जिल्हास्तरीय शिक्षकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. संघटनेच्या या दोन्ही उपक्रमांना सभासदांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

भांबेड प्रभाग व शिपोशी प्रभाग हा पूर्वीपासूनच शिक्षक समितीचा बालेकिल्ला असल्याने यापुढील काळातही शिक्षक समितीचे सर्व सभासद शिक्षक समिती मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला. संच मान्यतेच्या नवीन शासन निर्णयाला शिक्षक समितीचा तीव्र विरोध असून येत्या १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आंदोलन केले जाणार असल्याने सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिलीप दिवाळे यांनी केले.

स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष चंद्रकांत कांबळे, कोषाध्यक्ष सुदेश आयरे, जुनी पेन्शन युनिटचे तालुका उपप्रमुख उदय पाटील तसेच प्रभागातील सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली. सदर स्नेह मेळाव्यास दोन्ही प्रभागातील ज्येष्ठ सभासद व नवनियुक्त सभासद, कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुणगौरव सोहळा तसेच जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांचे, स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व पदाधिकारी तसेच सभासद यांचे तालुका सचिव दिनेश झोरे यांनी आभार व्यक्त करून स्नेह मेळाव्याची सांगता केली.