निमतवाडी सायामळी येथे गवारेड्याचा धुमाकूळ – हापूस आंबा बागायतीचे मोठे नुकसान

सचिन नरे यांना ९० हजारांचा फटका

शिरगाव (प्रतिनिधी) – शिरगाव निमतवाडी येथील बागायतदार सचिन नरे यांच्या हापूस आंबा बागायतीत गवारेड्याने धुडगूस घालत तब्बल ७५ ते ८० डझन हापूस आंबे फस्त केले. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेत सुमारे ९० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

शिरगाव आंबेखोल-निमतवाडी रस्त्याजवळील सायामळी मठ परिसरात सचिन नरे यांची १७० हापूस आंबा व ३०० काजू कलमांची १५ वर्षांची बागायत आहे. सोमवारी रात्री गवारेड्याने तोंडाशी मिळणारे सर्व आंबे खाऊन फस्त केले. तसेच, बागेच्या कुंपणाचे मोठे नुकसान झाले असून, गवारेड्याच्या पावलांचे ठसे स्पष्टपणे आढळून आले. झाडांवर फक्त आंब्याचे देठ शिल्लक असल्याचे दिसत आहे.

 

सचिन नरे यांनी वनविभागाला या नुकसानीची माहिती दिली असून, भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.

 

पावसाळ्यातील मशागत, लहरी हवामानाचा फटका, फवारणीचा वाढता खर्च, मजुरांची वानवा आणि उत्पादनातील घट यामुळे बागायतदार आधीच अडचणीत सापडले आहेत. त्यातच वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव मोठी समस्या बनली आहे.