जागतिक महिला दिन विशेष

देवळेतील महिलांनी एकत्र येत फुलवला ‘सुर्यफूलाचा मळा’

सुर्यफुलाच्या शेतीतून इतर महिलांसमोर ठेवला नवा आदर्श

*निलेश जाधव / देवरुख : आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे या उदात्त हेतूने संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील महिलांनी एकत्र येत सुर्यफुलाची शेती केली आहे. या महिलांनी सुर्यफुलाची शेती करत एकीचे बळीचे काय असते हे दाखवून दिले आहे. त्यांनी सुर्यफुलाच्या शेतीतून इतर महिलांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. महिला एकत्र आल्यावर काय करू शकतात हे देवळे येथील महिलांनी सुर्यफुलाची सामुहिक शेती करून दाखवून दिले आहे.

 

महिला म्हटलं की चूल आणि मूल ही जणू संकल्पनाच बनली आहे. मात्र याला छेद देत आताच्या आधुनिक युगात महिलाही पुरूषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना पहावयास मिळत आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या संसाराला हातभार लावत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील महिलांनीही एकत्र येत काहीतरी करण्याचे ठरवले. यानुसार आपण सुर्यफुलाची शेती करावी हा विचार त्यांच्या मनी आला. आणि लागलीच त्यांनी तो अंमलातदेखील आणला. उन्हाळी शेती म्हटलं की ती घाटमाथ्यावरच दिसते कारण घाट माथ्यावर पाण्याच्या सोई सुविधा चांगल्या असतात. शेतीसाठी मुबलक पाणी पुरवठा असतो. धरण, कालवे अशा व्यवस्था असतात आणि कोकणात पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष अशातच उन्हाळी शेती करणे म्हणजे विचारांच्या पलिकडचे असते. मात्र यालाही बगल देत देवळे गावातील काही महिलांनी एकत्र येत सुर्यफुलाची शेती करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

 

देवळेतील महिलांनी एकत्र येत सुर्यफुलाची शेती करण्याचे ठरवले. यानंतर देवळे गावातील बाजार पेठेजवळच प्रसाद अपंडकर यांच्या जागेत सुर्यफुलाची शेती करण्याचे श्रीम. रेश्मा परशेट्ये, सौ. अमृता शिंदे, सौ. गुरव, सौ. विनया अपंडकर, सौ. स्वरा आंब्रे, श्रीम. शुभांगी सक्रे, सौ. हर्षदा काळोखे, सौ. कोरगावकर, श्रीम. प्रगती पातेरे या महिलांनी निश्चित केले. व जागामालकाची रीतसर परवानगी घेवून सुर्यफुलाच्या रोपांची लागवड केली. बघता बघता ही रोपे मोठी होऊ लागली. सूर्यफूले पुर्ण उमलली असुन त्यात तेल बिया तयार होवू लागल्या आहेत. सकाळी पूर्वेकडे बघणारी सूर्यफूले सूर्याच्या गती प्रमाणे सायंकाळी पश्चिमेकडे वळताना दिसतात तोही वेगळा अनुभव येथे अनुभवता येतो. ही सुर्यफुले डोलू लागली आहेत. या सुर्यफुलाची शेती करून देवळेतील महिलांनी सोन्याची शेती केली आहे. असे म्हटले तर ते वावगे होणार नाही कारण सोन्यासारखी पिवळी धमक सुर्यफुले पाहून एक वेगळे समाधान मिळते.

 

वेगळी अनुभुती येते. कोकणच्या लाल मातीत सुर्यफुलाची सामुहिक शेती करुन या महिलांनी कोकणासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. रणरणरत्या उन्हात अंगाची काहिली होत असताना हिरव्यागार सुर्यफुलाच्या झाडावर सुर्यासारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांनी बहरलेल्या मळ्याचा आनंद घेणे काही औरच आहे. स्वतःच्या मेहनतीतून तयार झालेला सुर्यफुलाचा फुललेला मळा, डोलू लागणारी पिवळी धमक सुर्यफुले पाहताना खुद्द या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वकाही सांगून जात आहे. एक वेगळे समाधान या महिलांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. देवळेतील या महिलांनी सुर्यफुलाची शेती करून मनात आणले तर महिला काय करू शकतात याचा प्रत्यय दाखवून दिला आहे. त्यामुळे सुर्यफुलाची शेती करून इतर महिलांसमोर नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या महिलांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.