को रे मार्गावर शिमगोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांचे हाल कायम

सीएसएमटीला जाणाऱ्या गाड्या अंशतः रद्द केल्याचा फटका; २१ मार्चपर्यंत प्रवाशांना द्यावे लागणार तोंड
खेड(प्रतिनिधी)
शिमगोत्सवाची धामधूम सुरू झाल्याने चाकरमान्यांना गावचे वेध लागले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून होळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर करत चाकरमान्यांना सुखद धक्का दिला जात आहे. दुसरीकडे मात्र फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे सीएसएमटीला जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्या अंशतः रद्द केल्याचा फटका ऐन शिमगोत्सवाच्या तोंडावर चाकरमान्यांना बसत आहे. २१ मार्चपर्यंत चाकरमान्यांना या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याने त्यांच्या त्रासात नवी भर पडली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १०, ११, १२, १३ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे.  सद्यस्थितीत १२, १३ फलाटांची कामे हाती घेण्यात आली आहेत. नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत पायाभूत कामे पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे लक्ष्य धुळीसच मिळाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.
सीएसएमटी स्थानकातील १० व ११ च्या फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या मार्गस्थ करणे सुकर झाले आणि १३ च्या विस्तारिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या पायाभूत कामांमुळे २२१२० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी तेजस एक्प्रेस आणि १२०५२ मडगांव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशतः रद्द करण्यात आली आहे. १२१४३ क्रमांकाची मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेसही ठाणेपर्यंत चालवून अंशतः रद्द करण्यात आली आहे.
२१ मार्चपर्यंत या तीनही गाड्यांचे वेळापत्रक कायम राहणार आहे. यामुळे प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी आर्थिकसह सर्वच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. इच्छितस्थळ गाठण्यासाठी सोबतचे साहित्य घेवून पुन्हा लोकल किंवा टॅक्सीने प्रवास करण्याची नामुष्की ओढवत असल्याने आर्थिक मुर्दहासह मनस्तापही सहन
करावा लागत आहे. कोकणात शिमगोत्सवाची ग्रामधूम देखील सुरु झाली आहे. चाकरमानी हळूहळू गावी डेरेदाखलही होत आहेत.
ऐन शिमगोत्सवाच्या तोंडावरच सीएसएमटी स्थानकातील फलाट १२ व १३ च्या विस्तारीकरण कामामुळे अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचा फटका चाकरमान्यांना बसत आहे. इच्छितस्थळ गाठण्यासाठी चाकरमान्यांची यातायात सुरू आहे. एकीकडे कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी एकामागोमाग एक होळी स्पेशल जाहीर करत असल्याने चाकरमानी सुखावत आहेत, तर दुसरीकडे अंशतः रद्द केलेल्या गाड्यांमुळे मार्गात अडथळ्यांचा ‘स्पीडब्रेकर असल्याने चाकरमानी हतबल झाले आहेत