आंबोलीत पावसाची धुवाधार ; तालुक्यात विजांचा लखलखाट

आंबोली । प्रतिनिधी : एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असतानाच थंड हवेचे ठिकाण आंबोलीसह सावंतवाडी तालुक्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपले. सायंकाळच्या सुमारास अचानक बदलेल्या हवामानामुळे विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. तब्बल एक तास पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी संकटामुळे कोकणातील आंबा, काजू आणि फणस बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

एप्रिल महिन्याचा कडका सावंतवाडीकरांना अनुभवायला येत असताना आज सायंकाळी तालुक्यात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांचा लखलखाट सुरू झाला. त्यात थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीत धोधो पावसाने हजेरी लावली. यामुळे ग्रामस्थांची धांदल उडाली. तालुक्याच्या अन्य काही भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कोकणात आंबा आणि काजूचा हंगाम आधीच संकटात आलेला असतानाच या पावसाने घात केला आहे. पावसामुळे तयार आंबा आणि काजूच्या पिकाला नुकसान पोहचण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच फणसाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच दुष्काळ त्यात फाल्गुन मास अशी अवस्था कोकणातील शेतकऱ्यांवर ओढावली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांचे नियोजन कोलमडले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत कोकणातील बळीराजा आहे‌.