ईमेल हॅक करून बनावट कंपनीमार्फत फसवणूक
परदेशी व्यवहाराच्या नावाखाली रक्कम लंपास
पुण्यातील विमाननगर परिसरातील एका इंजिनीअरिंग कंपनीची सायबर चोरांनी मोठी फसवणूक केली आहे. ईमेल हॅक करून बनावट कंपनी तयार करत तब्बल 73 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. परदेशातून मशीन खरेदीच्या व्यवहाराच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. कंपनीला संशय न आल्याने त्यांनी रक्कम ट्रान्सफर केली. प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पुणे : विमाननगर परिसरातील इंजिनीअरिंग उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीची सायबर चोरांनी 73 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार जून 2024 ते एप्रिल 2024 दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या संचालकाने पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित कंपनी कार्टन बॉक्स पॅकिंग मशीन खरेदीसाठी जर्मन कंपनीशी ईमेलद्वारे संपर्कात होती. मात्र, सायबर चोरांनी ईमेल आयडी हॅक करून गोपनीय माहिती मिळवली आणि बनावट कंपनी तयार करून फसवणुकीचा डाव आखला.
फसवणूक करणाऱ्यांनी मशीनसाठी 86,747 यूएस डॉलरचे कोटेशन पाठवले, जे भारतीय चलनात सुमारे 73.18 लाख रुपये होते. कंपनीला संशय न आल्याने त्यांनी ईमेलमधील खात्यावर ही रक्कम ट्रान्सफर केली. हे खाते अमेरिकेतील शिकागो येथील बँकेत असल्याचे समोर आले.
रक्कम पाठवल्यानंतरही मशीन न मिळाल्याने कंपनीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. त्यानंतर संपूर्ण व्यवहार फसवा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.










