रत्नागिरी: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सकपाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी राज्यव्यापी दौरा करण्याचे निश्चित केले आहे. पक्षाची बांधणी ज्या जिल्ह्यात सर्वात कमी आहे. त्या विभागातून दौऱ्याला सुरुवात करण्यात येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून करण्यात येणार आहे. दि.१५ सिंधुदुर्ग व १६ मार्च रोजी रत्नागिरीत असे दोन्ही जिल्ह्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी श्री.सकपाळ घेणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी मंगळवारी कॉंग्रेस भवन येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेवून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या दौर्यांच्या निमित्ताने आवश्यक त्या सुचना केल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाचे काम कमी आहे. एकही स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या ताब्यात नाहीत. पक्षाला जिल्हाध्यक्षही नाही. या सर्व बाबींवर प्रदेशाध्यक्ष चर्चा करणार आहेत. त्यांनंतर जिल्हाध्यक्ष निवडीचाही निर्णय होईल असा विश्वास श्री. पाटील यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जेष्ठ नेते रमेश कीेर, अशोक जाधव, दिपक राऊत, सुरेश कातकर, संजय मयेकर, रुपाली सावंत आदी उपस्थित होते.












