एसटी वाहकाला मारहाण; खेडमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) : खेड-दापोली मार्गावर दस्तुरी गावाजवळ एसटी बसला साईड न दिल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन एसटी वाहकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हुंडाई क्रेटा चालक आणि एका महिलेविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. एसटी बसवरील वाहक पंढरी खुशाल गायकवाड हे आपले कर्तव्य बजावत असताना मंडणगड फाटा येथे पाठीमागून आलेल्या (MH08 AN 5981) क्रमांकाच्या क्रेटा कार चालकाने आपली गाडी एसटीसमोर आडवी लावली. यामुळे दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद निर्माण झाला.
वाद वाढत असताना एसटी चालक पर्शुराम नागरगोजे यांच्याशी क्रेटा चालकाने शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थिती शांत करण्यासाठी वाहक गायकवाड मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता क्रेटामधील महिलेने त्यांना “तू मध्ये का आलास?” असे म्हणत कानशिलात मारली तसेच त्यांच्याशी शिवीगाळही केली.
या घटनेनंतर गायकवाड यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अंतर्गत संबंधित चालक आणि महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.