तीनशे वर्षांनी जुळून आली परंपरा: मिठबाव, तांबळडेग, कातवणमध्ये देव होळीचा भव्य सोहळा

देवगड (प्रतिनिधी)देवगड तालुक्यातील मिठबाव कातवण तांबळडेग हे तीन गाव शासकीय महसुलीच्या दृष्टीने स्वतंत्र आहे मात्र या तिन्ही गावचे ग्रामदैवत एकच आहे ते म्हणजे मिठबाव श्री देव रामेश्वर. या तिन्ही गावांच्या ग्रामदैवताच्या आदेशाने तब्बल तीनशे वर्षांनी देवहोळी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

 मिठबाव, तांबळडेग, आणि कातवण या गावांचा श्री देव रामेश्वराचा वार्षिकोत्सव यंदा पारंपरिक पद्धतीने साजरा होत असून, या सोहळ्याने संपूर्ण गाव एकत्र आला आहे.यावर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी श्री देव रामेश्वराची कुणकेश्वर भेट घडली होती. या ऐतिहासिक घटनेनंतरच गावातील होळी उत्सव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. होळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री देव रामेश्वर रवळनाथ मंदिराजवळ माडाची होळी उभारून हा पवित्र सोहळा पार पडला.

होळी उभारणीसाठी लागणारा कल्पवृक्ष विजय काळे यांच्या बागेतून तोडून वाजत-गाजत मंदिराकडे आणून मंदिर परिसरात आंब्याच्या टाळांनी त्याला सजवून, टोकाला निशाण बांधून होळीच्या मांडावर होळी उभी करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये गावातील सर्व मानकरी गावघर रयतेने मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला.

    होळदेवाचे पवित्र पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गाव घर रयतेने होळदेवाचे दर्शन घेतले.रात्री ९ वाजता अवसर काढण्यात आली . यामध्ये पारंपरिक प्रथेनुसार शिवकळेसह अन्य देवतांनी अकरा प्रदक्षिणा घालून होळदेवाला वंदन केले. यानंतर उपस्थित भाविकांनी शिवकाळेसह अन्य देवतांचे दर्शन घेऊन हा ऐतिहासिक सोहळा अनुभवला.

         होळी उभारणीपासून पुढील पाच दिवस जागर करून श्री देव रामेश्वराचा होलिकोत्सव मंगलमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. तब्बल तीनशे वर्षांनंतर जुळून आलेल्या या उत्सवाने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण केले असून, पारंपरिक परंपरेचे भविष्यातील जतन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.