खेड (प्रतिनिधी) खेड बसस्थानकातून संगलट मार्गावर चालवण्यात येणाऱ्या दोन बसफेऱ्या संगलट-बौद्धवाडीपर्यंत चालवाव्यात, अशा मागणीचे निवेदन संगलटचे सामाजिक कार्यकर्ते विकास धुत्रे यांनी राज्य परिवहनच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा, असा आग्रही धरला आहे.
खेड बसस्थानकातून सकाळी ७.१५ वाजता व ९.३० वाजता मार्गस्थ होणारी खेड-संगलट या दोन्ही बसफेऱ्या संगलट मोहल्ल्यापर्यंतच धावतात. बौद्धवाडी, दवंडेवाडी।येथील शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृद्धांना ये-जा करण्यासाठी २ कि.मी. अंतर जंगलातून पायी चालावे लागते. यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. बसस्थानकातून सुटणाऱ्या दोन्ही बसफेऱ्या बौद्धवाडीपर्यंत चालवल्यास शालेय विद्यार्थ्यांसह वयोवृद्धांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. दोन्ही बसफेऱ्या बौद्धवाडीपर्यंत चालवून दिलासा द्यावा, अशी आर्जवही करण्यात आली आहे.











