खेड नगरपरिषदेचा कारभार प्रभारींकडेच !

khed nagar parishad
खेड(प्रतिनिधी)
खेड नगर परिषदेत प्रभारी मुख्याधिकाऱ्यांचा प्रकार  अजूनही कायम आहे. पावसाळा तोंडावर येवून ठेपलेला असतानाही अजूनही कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्ती करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवरून कुठल्याच हालचाली दिसून येत नाहीत. यामुळे नागरिकांची परवड सुरू असून विकासकामांचाही फज्जा उडाला आहे. तसेच पावसाळा तोंडावर आला तरी आपत्तीपूर्व नियोजनही फक्त कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
येथील नगर परिषदेत हर्षला राणे यांच्या रूपाने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्ती झाल्या होत्या. मात्र त्यांनी येथील पदभार स्वीकारल्यापासून विविध राजकीय पक्षांसह नागरिकांच्या रोषास समोर जावे लागले होते. यानंतर अवघ्या ६ महिन्यातच मुख्याधिकारी हर्षला राणे यांची अन्यत्र तडकाफडकी बदली झाल्यानंतर येथील नगर परिषदेत प्रभारींचा प्रकार  आजमितीसही कायम आहे.
सद्यस्थितीत देवरूखचे मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्याकडे येथील नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. ते येथील नगर परिषदेत अवघा एकच दिवस हजर रहात असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे विकासकामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. कर्मचाऱ्यांमध्येही कोणाचाच कोणाला पायपोस राहिलेला नसल्याने सर्वच विकासकामे रखडली आहेत
पावसाळा तोंडावर येवून ठेपला आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना राबवणे असतानाही प्रभारी गरजेचे मुख्याधिकाऱ्यांअभावी या उपाययोजना कागदोपत्री रंगवल्या जात असल्याचा सूर आळवला जात आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करा खेड नगर परिषदेत गेल्या अनेक महिन्यांपासून प्रभारी मुख्याधिकारीच कामकाज पाहत आहे. प्रभारी मुख्याधिकारीही मोजकेच दिवस नगर परिषदेत येत असल्याने दैनंदिन कामाकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची परवडच होत आहे.