कुवारबाव येथील वसतिगृहामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत केली आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी

तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटन गुरूवार 13 मार्च रोजी 8 वा. सुमारास ही घटना उघडकीस आली.

अमित गणेश चव्हाण (22) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे. अमित चव्हाण हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात (एसवाय. बी. ए) चे शिक्षण घेत होता. विद्यार्थ्यांना होळी सणाची सुट्टी असल्याने अमित चव्हाण हा बुधवारी रजा अर्ज देऊन वसतिगृहातून बाहेर पडला. घरी गेलेला अमित दुसर्‍या दिवशी गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वसतिगृहामध्ये आला. रूममध्ये आल्यावर त्याने रुमचा दरवाजा लावून घेत त्याने स्वतःला बंद करून घेतले होते. रूम बंद असल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावत त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र आतमध्ये असलेल्या अमितने कोणताही प्रतिसाद दिला नाही. विद्यार्थ्यांनी तातडीने घटनेची कल्पना येथील कर्मचार्‍यांना दिली. त्यानंतर वसतिगृहाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी दरवाजा तोडून आतप्रवेश केल्यावर त्यांना अमित गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला.