दोडामार्ग:
दोडामार्ग तालुक्यातील हेदूस येथे गोवा-राज्य परिवहन (एसटी) बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका ६८ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. दिलीप तुकाराम हळणकर (वय ६८, रा. कुडासे-वानोशी वाडी) असे मृताचे नाव असून, ते भारतीय नौदलातून (नेव्ही) १० वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.
अपघाताचा थरार
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप हळणकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना, पणजीहून धाराशिवकडे जाणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की हळणकर यांचा जागीच अंत झाला. अपघाताच्या वेळी बस चालक राहुलसिंह पांडुरंग हालके (वय ३७, रा. आवली खुर्द, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) आणि वाहक सुधीर अशोक लोखंडे हे बसमध्ये होते. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न एसटी चालकाने केला, मात्र वेग जास्त असल्याने हा प्रयत्न अपयशी ठरला.
सेवानिवृत्तीनंतर शेतीमध्ये रमले होते हळणकर
मयत दिलीप हळणकर हे मुंबई नेव्हीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या मूळ गावी कुडासे-वानोशी वाडी येथे स्थायिक झाले होते. तिथे ते आपली शेती आणि बागायती सांभाळत असत. त्यांच्या पश्चात घरी आजारी पत्नी आहे. या अपघाताच्या बातमीने कुडासे परिसरात शोककळा पसरली आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून तपास होणार
हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. फुटेजची पाहणी केल्यानंतरच दुचाकीस्वाराची चूक होती की बस चालकाची, हे निष्पन्न होईल.
पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, बस चालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.












