दारूच्या नशेत बळजबरीने ७० वर्षीय महिलेच्या पायाला मालिश करून केली दुखापत

पालु चव्हाणवाडी येथील घटना, एकावर गुन्हा दाखल 

लांजा (प्रतिनिधी) दारूच्या नशेत ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या दोन्ही पायांना बळजबरीने मालिश करून तिच्या पायांना दुखापत केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी पालू येथील एकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद राज नारायण राणे (वय ३५ राहणार पालू चव्हाणवाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात केली आहे. राज राणे यांची आई श्रीमती सरिता नारायण राणे (वय ७० वर्षे ) ही दिनांक १५ मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरात बसलेली असताना त्यांच्याच वाडीत राहणारा अशोक महादेव चव्हाण( वय ५५) हा रात्री आठच्या सुमारास दारूच्या नशेत त्यांच्या घरी आला आणि सरिता राणे यांना मी तुमचा पायाला मालिश करून देतो असे सांगितले. मात्र सरिता राणे यांनी नकार दिला असताना देखील अशोक चव्हाण याने दारूच्या नशेत बळजबरीने त्यांच्या पायाला मॉलिश करून दुखापत केली. त्यानंतर यांना उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे .

अशाप्रकारे बळजबरीने ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या दोन्ही पायांना बळजबरीने मालिश करून दुखापत केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी अशोक महादेव चव्हाण यांच्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार सचिन भुजबळराव हे करत आहेत

_______________________________________