
सचिन रेडकर l सावंतवाडी :सप्तरंगांची उधळण करणारा रंगांचा सण म्हणजे शिमगोत्सव. हुताशनी, शिमगा, शिगमा, होळी, होरी,दोलोत्सव, कामदहन आणि प्रचलित शिमगोत्सव अशा विविध नावांनी हा सण ओळखला जातो. तळकोकणात पावलागणिक बदलणाऱ्या बोलीभाषेप्रमाणेच शिमगोत्सवाच्या प्रथा आणि स्वरूपही बदलत जातं. परंपरा जपणारा हा रंगोत्सव पाच, सात, नऊ दिवस तर काही ठिकाणी पंधरा दिवस साजरा होतो. कोकणातील लोकसंस्कृती जागवणारा हा सण इथल्या माणसाच्या जीवनाशी अत्यंत जवळीक साधणारा आहे. कोकणातील सह्याद्रीच्या पट्ट्यापासून ते सागरतीरापर्यंत विविध रंगरूपात संपन्न होणाऱ्या शिमगोत्सवाचा हा वेध –
शिमगा संस्कृत मधील शृंगार, सुग्रीष्मक असाही त्याचा उल्लेख आढळतो. उन्हाळ्यामुळे लाही लाही होणारे दिवस सुसह्य व्हावे म्हणून चैत्र पुनवेने सुरू होणाऱ्या नव्या वर्षाच्याआधी रंग खेळण्याची ही परंपरा अस्तित्वात आली असावी. पुराणात श्रीकृष्ण गोपिकांसमावेत रंग खेळत होते याचे दाखले काही ग्रंथांमध्ये आहेत. तेव्हापासूनच कदाचित शिमगोत्सव प्रचलित असावा. मात्र, महाराष्ट्रात या उत्सवाला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला तो सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात. कलासक्त असलेल्या माधवरावांनी त्याकाळी अनेक कलांना राजाश्रय मिळवून दिला होता. माधवराव स्वतः निर्भीडपणे रंगपंचमी खेळायचे. महाराष्ट्राच्या पांढरपेशा समाजात तेव्हापासून रंगांच्या या उत्सवाला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा प्राप्त झाली असावी. वीर सावरकरांच्या ‘श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांचा रंग’ या कवितेत माधवरावांच्या या रंगपंचमीचा उल्लेख आढळतो. पुराणकाळापासून शिमगोत्सव संपन्न होत असला तरी महाराष्ट्र व गोमंतकाच्या सांस्कृतिक परंपरेत असलेल्या शिमगोत्सवाचे महत्त्व यातूनच दिसून येतं.
घुमटांची घूम, रोमटांची बोंब, राधेचे खेळे आणि सोंगांचे पॉस अशा विविध प्रकारांनी ढोल-ताशांच्या गजरात साजरा होणारा शिमगोत्सव तळकोकणातील गावागावात संपन्न होत त्या गावागावातील प्रथा परंपरांचे जतन करीत असतो. आंबोली चौकुळसारख्या सह्याद्रीच्या पट्ट्यात महाशिवरात्रिपासूनच या सणाची रंगत सुरू होते. ‘रनभला’ च्या रूपात येथील प्रमुख देवकरी व तीन खोतांच्या घरी शिवरात्रीपासून ते होळीपर्यंत रात्री जागवल्या जातात. रामायण व महाभारताच्या कथांवर आधारित विविध पारंपारिक सोंग घेऊन घुमट वादनावर हे खेळे नाचतात. या कथांना जती असं संबोधलं जातं. रनभला सांगण्याची प्रथा आताच्या पिढ्यांनी आत्मसात न केल्याने कालपरत्वे नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे. आंबोली, चौकुळ, गेळे, तेरवण घारपी अशा सर्व माथ्यावरील भागात हाच प्रकार चालतो. चौकुळचे आणखी एक विशेष म्हणजे येथील होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.
घाटमाथ्याच्या पायथ्याशी शिमगोत्सवाची सुरुवात होते ती सांगेलीच्या गिरोबाच्या प्रतिष्ठापनेने. गिरिजानाथांच अर्थात शिव शंकराचे रूप असलेला सांगलीचा फणसाच्या झाडापासून तयार होणारा ‘गिरोबा’ नंतर वर्षभर तेथील मंदिरात मूर्तीच्या रूपात स्थानापन्न होतो. गिरोबानंतर होळी पौर्णिमेच्या दिवशी गावागावात होळ्या उभारल्या जातात. अलीकडे उंचच उंच होळी उभारण्याची अघोषित स्पर्धाही चालते. आंबा, फणस, पोफळी तर काही ठिकाणी सागवृक्षाच्या ही होळ्या उभारल्या जातात. अमंगलाचा नाश करणारा हा होलिकोत्सव शिमग्यातील एक वेगळेपण जपत असतो.
अशाच प्रकारे वेगळेपण जपणारी अशी मळगावची सुवारड्याची होळी ही देखील एक अद्भुत परंपरा मानली जाते. सावंतवाडी व मळगावच्या सरहद्दीवर असलेल्या नरेंद्र डोंगराचा एक उंच कडा असलेल्या सुवारड्याच्या कड्यावर एका प्रशस्त खडकावर ही होळी उभारली जाते. गावचे मानकरी व बारा बलुतेदार वाजत गाजत ढोल-ताशांच्या गजरात सकाळच्या सुमारास या ठिकाणी डोंगर चढून दाखल होतात. गावकरीही होळीच्या मानाचा नारळ घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असतात. गाऱ्हाणे बोलणे झाल्यावर गतवर्षीची जुनी होळी सन्मानाने उतरून त्या ठिकाणी नवी होळी उभारली जाते. गिरोबाप्रमाणेच ही होळी देखील वर्षभर तेथेच सन्मानाने उभी राहते. वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरू आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सुप्रसिद्ध सोनुर्ली माऊलीचा गाव अर्थात सोनुर्ली – मळगाव. या गावातील आणखी एक प्रचलित परंपरा म्हणजे हळदवणी परंपरा. घुमट वादनाबरोबरच चिलमीचे व घुडघुड्याचे झुरके घेत हळदीचे पाणी या वेळी शिंपडलं जातं. यानंतर सातव्या दिवशी गावातील घराघरात कलशाने भरलेले तीर्थ पोहोचवलं जातं. पाच हजाराहून अधिक लोकवस्ती आणि दोन हजार घरे असलेल्या मळगावात हा कलश रिले पद्धतीने फिरत असतो. सर्वांना देवाचं तीर्थ दिलं जातं. ही अनोखी परंपरा ‘कळसवणी’ म्हणून प्रचलित आहे. यावेळी घराघरात या कलशाचं पूजन करून गार्हाणी घातली जातात. हा कलश दुपारपर्यंत पूर्ण गाव फिरून मंदिरात परत आणला जातो.
सिंधुदुर्गातील शिमगोत्सवातील वेगळेपण जपणाऱ्या अनेक परंपरांतील एक आगळीवेगळी परंपरा म्हणजेच सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा सुप्रसिद्ध ‘हुडोत्सव’. तब्बल १०० हून अधिक फूट उंच असलेल्या ‘हुडा’ रुपी होळीच्या माथ्यावर चढून बसलेल्या ‘गड्यां’वर दगड मारण्याची प्रथा येथे प्रचलित आहे. या हुडोत्सवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळलेली असते. शिमगोत्सवाच्या सातव्या दिवशी हा सण साजरा होतो. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील गर्दीवर नियंत्रण आले असले तरीही परंपरा जपत हे सण साजरे केले जात आहेत.
शिमगोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘राधेचे खेळे’. गावागावात हे खेळे चालतात. पुरुषाला स्त्रीचा शृंगार करून वाद्यांच्या गजरात ‘चला राधा सखी बाजारी’ ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ ‘आज आनंदी आनंद झाला’ अशा जुन्या व आधुनिक गीतांच्या ठेक्यावर ताल धरत राधेचे खेळ रंगतात. महाभारत व रामायणातील वेगवेगळी पात्र यात सहभागी होतात. सिंधुदुर्गावर दशावताराचा पगडा असल्याने त्यातील राम, श्रीकृष्ण, मारुती, भीम, अर्जुन तर पुराणातील शंखासुरासारखे दैत्य यांची रूपेही यात भाग घेतात.
राधा, रोंबाट या प्रचलित पद्धतींसोबतच समुद्रकिनाऱ्याजवळील गावांमध्ये घोडेमोडणी, चुडत्यांची रोंबाट आदी प्रकार पाहायला मिळतात. तर मडुरा गावातील श्रद्धास्थान असलेल्या श्री देव शिवशंकराचे रूप असलेल्या ‘होर्डेश्वरा’चा मुखवटा परिधान करून ‘कुटुंबो’त्सव हा आगळावेगळा कार्यक्रम साजरा केला जातो. यावेळी सिंधुदुर्गसहित गोमंतकातील हजारो भाविक उपस्थित असतात. सहाव्या रात्री साजरा होणाऱ्या या उत्सवाच्या वेळी नवस बोलणे, फेडणे असा मोठा कार्यक्रम होतो.
नेरूर भागातील ग्रामस्थांचा रोंबाट, मालवण मसुरे भागातील सावकारी रोंबाट, नमन-खेळे, गवताचे किल्ले, कवळास, कापड खेळे असे विविध लोककला प्रकारही शिमगोत्सवाच्या निमित्ताने पाहायला मिळतात. गोमंतकात धाकटा व व्हलडा (मोठा) शिगमा असेही या शिमगोत्सवाला संबोधलं जातं. शिमगोत्सवात कोण कसं सोंग आणिल हे सांगता येत नाही. काही गावांत परंपरेने वाघाचा मुखवटा व रुपडं घालून घराघरात दर्शन दिलं जातं. तर किनारपट्टीच्या भागात तसेच गोमंतकात व कुडाळ कणकवलीनजीकच्या काही भागात ‘बनोटे’ फिरविण्याची तसेच आगीचे लोळ फुंकून मशाली पळविण्याची ही पद्धत पाहायला मिळते. ढोल-ताशांच्या धीरगंभीर सुरांमध्ये बनोट्यांची थरारक स्पर्धा रंगत जाते. रॉकेलने भरलेल्या मशालींची जळती चाकं वेगाने फिरविण्याची यावेळी चढाओढ लागते. तर तोंडात रॉकेल भरून त्याचा फवारा मशाली वर सोडून आग फुंकण्याचा खतरनाक खेळही खेळला जातो. तर हजारो मशालींची धावती रांगही काही गावात पाहायला मिळते.
अलीकडे या शिमगोत्सवात रोम बाटा बरोबरच वेगवेगळे चित्ररथही करण्याची चढाओढही लागते. कुडाळ तालुक्यातील नेरूरच्या शिमगोत्सवात ही परंपरा दिसून येते. ‘गावड्यांचे रोंबाट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उत्सवावेळी पौराणिक कथा उलगडणार्या अनेक चलतचित्रांचे यावेळी दर्शन घडतं. यात आदी पुरुष, गणेश दर्शन, देवींची रूपं, विष्णूचे अवतार इत्यादी पात्र साकारली जातात. अलिकडे कोंबडे, मोर, डायनासोर यासारखे अक्राळ विक्राळ प्राणीही रंगत आणतात. मात्र, या शिमगोत्सवात इतर ठिकाणच्या शिमगोत्सवाप्रमाणे मद्यपान व मांसाहार चालत नाही.
अशा विविध रंगात रंगत जाणाऱ्या या शिमगोत्सवाची ‘धुळवडी’ने सांगता होते. शिमग्याची बोंब आणि वाद्यांच्या गजरात या वेळी ‘घोडेमोडणी’ केली जाते. या वेळी गड सर करणे, किल्ला जाळणे, आगीवरून उड्या मारणे आदी विविध प्रकार केले जातात. शेवटी होळी उजवून या कार्यक्रमाची सांगता होते. नकारात्मक विचारसरणीवर सकारात्मकतेचा रंग चढवून जीवनाचा खरा आनंद घेण्याचा अनोखा मंत्र देणारा हा सण प्रथा आणि परंपरांचे जतन करीत साजरा होतो.












