गो परिपोषण योजनेअंतर्गत गोशाळेच्या बँक खात्यावर अनुदान जमा
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच राणे बंधू, सामंत व मुंदडा यांचे मानले आभार
अन्य प्रश्नांच्या पूर्ततेसाठी उपोषण सुरूच राहणार
चिपळूण (प्रतिनिधी):– लोटे परशुराम येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थानच्या गोशाळा संदर्भातील विविध मागण्यांसाठी ह. भ. प. भगवान कोकरे महाराजांनी १७ मार्चपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला पहिल्या टप्प्यात यश आले असून शासनाने गो- परिपोषण योजनेअंतर्गत गोशाळेच्या बँक खात्यावर ३३ लाख ४८ हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती उपोषणकर्ते व या गोशाळेचे ह. भ. प. भगवान कोकरे यांनी दिली. याबद्दल कोकरे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, गो सेवेचे अध्यक्ष शेखर मुंदडा, मत्स्य बंदर मंत्री ना. नितेश राणे, आ. निलेश राणे, पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. भरत गोगावले यांचे आभार मानले आहेत. मात्र, अन्य प्रश्नांच्या पूर्ततेसाठी आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचे देखील कोकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोटे परशुराम येथे गेल्या काही वर्षांपासून ह. भ.प. भगवान कोकरे गोशाळा चालवीत आहेत. या गोशाळेत ११०० हून अधिक गाई आणि वासरांची देखभाल केली जाते. मात्र गोशाळेच्या प्रश्नांसाठी कोकरे यांना संघर्ष करावा लागत आहे. यामध्ये गेली चार वेळा उपोषण छेडले होते. आता पुन्हा ते १७ मार्चपासून पाचव्यांदा उपोषणाला बसले आहेत.
या उपोषणाला पहिल्या टप्प्यात यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गो सेवा चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी गोशाळेच्या चाऱ्याची दखल घेऊन गो परिपोषण योजनेअंतर्गत ३३ लाख ४८ हजार रुपये गोशाळेच्या बँक खात्यात जमा केले आहेत, अशी माहिती कोकरे यांनी पत्रकारांना दिली. यासाठी मत्स्य बंदर मंत्री ना नितेश राणे, पालकमंत्री ना. उदय सामंत आ. निलेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम, आ. भरत गोगावले यांनी देखील सहकार्य केले. याशिवाय माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे देखील आम्हाला नेहमीच सहकार्य मिळते. तसेच महाड येथील लक्ष्मण जगताप यांचे देखील सहकार्य राहिले आहे, असे कोकरे यांनी यावेळी सांगितले.
शासनाने गाईंच्या चाऱ्याच्या अनुदानाचा प्रश्न सोडवला असला तरी अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये गोशाळेचे मंजूर २५ लाखांचे अनुदान तत्कालीन मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी देण्याची शिफारस केली असतानाही ते अद्याप अदा झालेले नाही. ते अदा व्हावे. गोशाळेला व्यवसायिक दराने वीज पुरवठा होत असल्याने सुमारे साडे पाच लाख रुपये बिल थकीत राहिले आहे ते बिल शासनाने माफ करावे. शेतीप्रमाणे वीज बिल आकारण्यात यावे, यासाठी महावितरणकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची भावना कोकरे यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रलंबित प्रश्नांसाठी आपले उपोषण सुरूच राहणार आहे. या प्रश्नाकडे शासन लक्ष देईल, अशी आपली अपेक्षा आहे,असे ह. भ. प. भगवान कोकरे यांनी यावेळी बोलून दाखवले.












