लांजा साटवली मार्गावर बेसुमार वृक्षतोड
लांजा ( प्रतिनिधी) :एकीकडे शासन वसुंधरा दिन साजरा करत असताना दुसरीकडे मात्र वसुंधरा दिनीच आंबा, फणस, अकेशिया व अन्य वृक्षांची तोड केली जात असून वसुंधरा दिनाला हरताळ फसला जात आहे. लांजा साटवली मार्गावर महावितरणच्या वीज वाहिन्यांसाठी असंख्य झाडांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्यामुळे वृक्षप्रेमीतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, वीज वाहिन्यांसाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडायच्या की संपूर्ण झाडेच तोडून जमीनदोस्त करायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक का करत आहे असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
एकीकडे मोठ्या प्रमाणावर चाललेल्या वृक्षतोडीमुळे तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. दरवर्षी शासनाकडून २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. वृक्षांचे मानवी जीवनातील असलेले अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता हा दिन महत्त्वाचा मानला जातो. मात्र एकीकडे आपण हा वसुंधरा दिन साजरा करत असताना दुसरीकडे मात्र याच दिवशी लांजा साटवली मार्गालगत असलेल्या आंबा, फणस, अकेशिया यासारख्या वृक्षांवर वेसुमार कुऱ्हाड चालवली जात आहे. कोंडये पालयेवाडी, कोत्रेवाडी या दरम्यान शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
महावितरण च्या वीज वाहिन्यांसाठी झाडांवर कुऱ्हाड चालवले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत
असलेली झाडे राजरोसपणे तोडली जात आहेत. वास्तविक पाहता वीज वाहिनांसाठी अडथळा ठरतील अशा झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता सरसकट झाडे तोडली जात आहेत. तोडण्यात येत असलेल्या झाडांचे मूल्यांकन केले जात आहे का? हा देखील प्रश्न आहे.असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे की जाणीवपूर्वक लक्ष दिले जात नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे











