सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सुसज्ज निवासस्थाने उभारणार

नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

रुग्णालयातील भौतिक सुविधा, स्वच्छता आणि दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सेवा-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी सुसज्ज शासकीय निवास व्यवस्था उभी करण्याचा संकल्प नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत रुग्णालयातील भौतिक सुविधा, स्वच्छता आणि दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याचे निश्चित करण्यात आले.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीने रुग्णालयातील समस्यांबाबत नगराध्यक्षांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही बैठक पार पडली.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर, वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर ऐवळे, कृती समिती निमंत्रक एन.बी. रेडकर, संजय लाड, क्रुज फर्नांडिस, पालिका आरोग्य निरीक्षक विनोद सावंत, उद्यान पर्यवेक्षक गजानन परब उपस्थित होते.

रुग्णालय परिसरात वाढलेली झाडेझुडपे आणि अस्वच्छतेची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले-देसाई यांनी चार दिवसांत परिसर साफ करून देण्याचे मान्य केले. तसेच, पोस्टमार्टम रूमची इमारत मोडकळीस आली असून शेजारील आंब्याच्या झाडाच्या फांद्यांमुळे होणारा त्रास दूर करण्यासाठी फांद्या तात्काळ छाटण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी पालिका प्रशासन व बांधकाम विभागाला दिल्या.

रुग्णालयात येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी जागा नसल्याने त्यांची होणारी ओढाताण थांबवण्यासाठी पालिकेतर्फे चार बाकडे बसवण्याचा निर्णय झाला. तसेच, शवागृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असून तो तातडीने दुरुस्त केला जाईल, असे बांधकाम विभागाने सांगितले. प्रकाश व्यवस्थेसाठी परिसरात दोन ठिकाणी हायमास्क दिवे लावण्याचेही पालिकेमार्फत मान्य करण्यात आले.

*डॉक्टरांच्या निवासस्थानांचा प्रश्न*

रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी राहत असलेल्या क्वार्टर्सची स्थिती अत्यंत दयनीय असल्याकडे संजय लाड व एन.बी. रेडकर यांनी लक्ष वेधले. यावर चर्चा होऊन निवासस्थाने दुरुस्त करण्याच्या आणि नवी सुसज्ज व्यवस्था करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. बैठकीतील सकारात्मक निर्णयांबद्दल कृती समितीने समाधान व्यक्त करत नगराध्यक्षांचे आभार मानले.