खेड (प्रतिनिधी)रायगड किल्ल्यावर सेल्फी काढत असताना बुरुजावरुन खाली कोसळून प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडली. भीमराव अडकोजी घायवाल (रा. पुणे-तुपे) असे त्या मृत प्रौढाचे नाव आहे.
भीमराव घायवाल हे २० मार्च रोजी पुणे येथून महाड येथे आले होते. महाड येथील चवदार तळ्यावरील नियोजित कार्यक्रम आटपल्यानंतर घायवाल हे किल्ले रायगडावर फिरण्यासाठी गेले होते. ते गडावरील एका बुरुजावर गेले असता सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेल्याने खाली. कोसळले. बुरुजावरुन खोलवर कोसळल्याने या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. रायगडावर फिरण्यासाठी आलेल्या अन्य शिवप्रेमींच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर महाड पोलिसांना घटनेबाबत कळवण्यात आले. अखेर बचाव पथकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











