कलमठ बौद्धवाडी येथील तरुणाचा रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न 

कणकवली – शहरातील कलमठ बौद्धवाडी येथील अमित उदय कदम ( वय ३९ रा. कलमठ बौद्धवाडी ) याने आपल्या राहत्या घरात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अमित हा मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. ही घटना सोमवारी सायंकाळी ७:३० ते ८ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत अमित याला अर्धवट जळलेल्या स्थितीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणले. अंगाला साधारणपणे डाव्या हाताची बोटे, छाती, आणि उजव्या हाताला काही प्रमाणात शरीर भाजले होते. घटनेची माहिती कणकवली पोलिसांना देण्यात आली. यावेळी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विनोद सुपल उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. दरम्यान यावेळी अमित यांच्यावर उपचार करून जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले. घटनास्थळी मिळालेल्या महितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून व नशेत असल्याने घडली असल्याची माहिती मिळाली.