​वादळात कोसळलेल्या वटवृक्षाला सावंतवाडी पालिकेकडून ‘नवसंजीवनी’

कारिवडे प्रकल्पावर पुनर्रोपण; मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या सूचनेनुसार कार्यवाही

​सावंतवाडी | प्रतिनिधी :
शहरात अलीकडेच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जुन्या मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या महापुरुष देवस्थान परिसरातील एक जुना वटवृक्ष मुळासकट कोसळला होता. मात्र, निसर्गाचा हा वारसा जतन करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेने तत्परता दाखवली असून, या वटवृक्षाचे कारिवडे येथील प्रकल्पावर यशस्वीरीत्या पुनर्रोपण करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या या पर्यावरणस्नेही भूमिकेमुळे या वृक्षाला एक प्रकारे ‘नवसंजीवनी’ मिळाली असून, सबनीसवाडा येथील नागरिक व पर्यावरण प्रेमींकडून पालिकेचे कौतुक होत आहे.

​काही दिवसांपूर्वी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महापुरुष देवस्थान येथील हा डेरेदार वटवृक्ष कोसळला होता. यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करताना पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी हा वृक्ष केवळ कचरा म्हणून न हटवता, त्याचे पुनर्रोपण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. हा वृक्ष नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेत सुरक्षित ठिकाणी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.

​३०० झाडांच्या सोबतीला आता वटवृक्ष
मुख्याधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, नगरपरिषदेच्या उद्यान विभागाने तातडीने हालचाली करत हा वटवृक्ष कारिवडे येथील नगरपालिकेच्या प्रकल्पावर हलवला. या ठिकाणी पालिकेने आधीच सुमारे ३०० हून अधिक विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून मोठे उद्यान विकसित केले आहे. याच परिसरात आता या वटवृक्षाची शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्लागवड करण्यात आली आहे.

​प्रशासकीय तत्परतेचे कौतुक
उद्यान पर्यवेक्षक गजानन परब यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन हे पुनर्रोपण यशस्वी केले. एखादे झाड कोसळल्यानंतर सहसा ते तोडून टाकले जाते, मात्र सावंतवाडी नगरपरिषदेने संवेदनशीलता दाखवत या वृक्षाचे रक्षण केले आहे. या कार्यामुळे सबनीसवाडा परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी समाधान व्यक्त केले असून, विनायक औंधकर व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.

​”निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जुन्या वृक्षांचे जतन करणे आवश्यक आहे. महापुरुष देवस्थान येथील हा वृक्ष वाचवण्यासाठी आम्ही त्याला कारिवडे येथील प्रकल्पात सुरक्षित स्थान दिले आहे, जिथे त्याची योग्य देखभाल केली जाईल.”
— गजानन परब (उद्यान पर्यवेक्षक, सावंतवाडी न.प.)