रत्नागिरी | प्रतिनिधी
तालुक्यातील खांबडवाडी-नाखरे येथे इको कार आणि ओला दुचाकी समोरा-समोर धडकून भीषण अपघात झाला. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना बुधवार 26 मार्च रोजी दुपारी 2 ते 2.15 वा. सुमारास घडली.
चंद्रवदन शैलेंद्र शिंदे दसूरकर (30,रा.उंबरवाडी स्टॉप नाखरे,रत्नागिरी) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर या अपघातात इको कार चालक अनिकेत खाके (रा.नाखरे,रत्नागिरी) यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुधवारी दुपारी चंद्रवदन शिंदे दसूरकर हा आपल्या ताब्यातील ओला दुचाकी (एमएच-08-बीजी-2916) घेउन पावस ते नाखरे असा आपल्या घरी जात होता. त्याच सुमारास अनिकेत खाके हा आपल्या ताब्यातील इको कार (एमएच-47-एबी-2194) घेउन नाखरे ते पावस असा येत होता. ही दोन्ही वाहने खांबडवाडी येथे आली असता इकोकार चालक अनिकेत खाकेचा आपल्या कारवारील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणार्या चंद्रवदनच्या दुचाकिला धडक देत अपघात केला. ही धडक इतकी जोरदार होती कि,त्यामुळे चंदवदनच्या डोक्याला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, त्यावेळी नाखरे गावचे पोलिस पाटील त्याच रस्त्याने जात असताना त्यांना हा भिषण अपघात दिसताच त्यांनी तातडीने पूर्णगड पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. चंद्रवदनच्या अपघाताची माहिती मिळातच त्याच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने जिल्हा शासकिय रुग्णालयात धाव घेतली होती. सायंकाळी उशिरा मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









