सावंतवाडी । प्रतिनिधी : दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण संधी उद्या, शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ रोजी सावंतवाडी येथे उपलब्ध होणार आहे. भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या माध्यमातून आणि साहस प्रतिष्ठानच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तींसाठी ‘रोजगार व संधी’ या विषयावर मार्गदर्शन आणि नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सावंतवाडीतील दिव्यांग विकास केंद्र, समाजमंदिरच्या बाजूची इमारत येथे सकाळी ९:३० ते १२:०० या वेळेत आयोजित केले जाईल. राष्ट्रीय करियर सेवा, मुंबई येथील अधिकारी या शिबिरात दिव्यांगांना रोजगाराच्या विविध संधींविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, गव्हर्मेंट पोर्टलवर नोंदणी करण्याची प्रक्रिया देखील समजावून सांगितली जाईल.
या पोर्टलवर नोंदणी केल्याने दिव्यांग बांधवांना सरकारी योजना, रोजगाराच्या संधी आणि सरकारी नोकरीच्या रिक्त जागांची माहिती वेळोवेळी मिळत राहील. याव्यतिरिक्त, नियोक्त्यांसाठी राष्ट्रीय करिअर सेवा, दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन, ई-श्रम कार्ड नोंदणी आणि औद्योगिक विवादांसाठी समाधान पोर्टल यांसारख्या सुविधा मंत्रालयाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुक दिव्यांग बांधवांनी खालील कागदपत्रे सोबत आणावीत:
१) दिव्यांग प्रमाणपत्र (२ झेरॉक्स)
२) यू. डी. आयडी कार्ड (२ झेरॉक्स)
३) आधार कार्ड (२ झेरॉक्स)
४) पासपोर्ट साईज दोन फोटो
साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने सर्व १५ ते ५० वयोगटातील दिव्यांग बांधवांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी श्रीम. रुपाली पाटील यांच्याशी ९०४९२७१७४४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.










