दोडामार्ग तालुक्यात अवैध माती उत्खननाविरोधात उपोषणाचे हत्यार; तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

​दोडामार्ग प्रतिनिधी

तालुक्यातील आडाळी, कुंब्रल, शिरवल, कळणे, सासोली यांसह विविध गावांमध्ये रात्रीच्या सुमारास सुरू असलेल्या खनिजसदृश्य माती उपशाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले. अखेर तहसीलदार राहुल गुरव यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी हे उपोषण मागे घेण्यात आले.

​भरारी पथकांची नियुक्ती आणि कारवाईचा इशारा

आंदोलनाचा वाढता दबाव पाहून तहसीलदार राहुल गुरव यांनी तातडीने आदेश निर्गमित केले आहेत. २३ एप्रिलपासून तालुक्यात अवैध उत्खनन रोखण्यासाठी विशेष ‘भरारी तपासणी पथकांची’ नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांवर निवासी नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने व महसूल नायब तहसीलदार संजय मद्रे यांचे थेट नियंत्रण असेल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.