काडवली ते धामणंद मार्गावर ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवड

शिवसेना खेड -गुहागर तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केला संताप

चिपळूण (प्रतिनिधी):– खेड तालुक्यातील काडवली ते धामणंद मार्गावर चक्क ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या मार्गावर शेकडोहून अधिक सुकलेल्या रोपांची लागवड करण्याचा अजब प्रकार घडला आहे. या प्रकाराबाबत शिवसेना खेड गुहागर विधानसभा मतदारसंघाचे तालुकाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

काडवली ते धामणंद मार्गावर शेकडोहून अधिक रोपे लावून केवळ वृक्ष लागवड उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात असल्याचे समजत आहे. ऐन उन्हाळ्यात वृक्ष लागवड केली जात असल्याचे पाहून या मार्गावरून ये- जा करणारे वाहन चालक तसेच ग्रामस्थ सारेच अवाक झाले आहेत. या मार्गावर सुकलेल्या रोपांची लागवड करून खात्याला नेमके काय साध्य करायचे आहे ? असा उपहासात्मक प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

चौकट

ऐन वृक्ष लागवड करण्याचा हेतू काय? – अरविंद चव्हाण

काडवली ते धामणंद मार्गावर चक्क उन्हाळ्यातच सुरू असलेली वृक्ष लागवड ही आश्चर्यकारकच बाब म्हणावी लागेल. खड्ड्यांमध्ये सुकलेली रोपे लावण्यात आली असून या मागचे नेमके रहस्य काय? उन्हाळ्यात वृक्ष लागवड करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा हेतू काय? या वृक्ष लागवडीवर निधी खर्च करण्याची गरजच काय? या प्रकाराची सखोल चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी शिवसेना गुहागर खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांनी केली आहे. तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी सदरील काम थांबवले असल्याची माहिती दिली असल्याचे श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.