आंबोली । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान आंबोली-नांगरतास येथे भव्य स्वागत करण्यात आले. आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज आंबोली नांगरतास येथील वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्र येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या आगमनानंतर आंबोली-नांगरतास येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी बोलताना सौ. पालेकर म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री महोदयांचे आंबोलीत आगमन आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागाच्या विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल,” असे यावेळी सौ. पालेकर म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ग्रामस्थांचे अभिवादन स्वीकारले आणि त्यांच्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी आंबोली परिसरातील विकासकामांबाबत माहिती घेतली आणि आंबोलीच्या विकासासाठी काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
या स्वागत समारंभावेळी ना. हसन मुश्रीफ, आ. दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, प्रेमानंद देसाई, संदीप राणे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












