उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंबोली आणि गेळे येथील ऊस संशोधन केंद्रांना भेट दिली

सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सकाळी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली नांगरतास आणि गेळे येथील ऊस संशोधन केंद्रांना भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ऊसाच्या नवनवीन प्रजातींविषयी माहिती घेतली तसेच दोन्ही केंद्रांच्या प्रगतीबाबत चर्चा केली. गेळे येथील केंद्रातील रस्ते आणि पाणीपुरवठा यांसारख्या विषयांवरही यावेळी विचारविनिमय करण्यात आला.

या दौऱ्यादरम्यान वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, आंबोली सरपंच सविता पालयेकर, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, काका कुडाळकर, सावळाराम अणावकर, प्रफुल्ल सुद्रिक आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “मागच्या वेळी जेव्हा मी कोल्हापूर दौऱ्यावर आलो होतो, तेव्हाच आंबोलीला भेट देण्याचे निश्चित केले होते. येथील ऊस संशोधन केंद्राची पाहणी करून काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, असा माझा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आज मी येथे आलो आहे.” तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करण्यावर सरकारचा भर राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नांगरतास येथे महत्त्वपूर्ण बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेळे येथील ऊस संशोधन केंद्राची पाहणी केल्यानंतर नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रात उपस्थित अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत केंद्रातील निवडक अधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री महोदयांना केंद्राच्या कार्याची माहिती दिली.