५ एप्रिल रोजी चावडी वाचन घेण्याच्या सूचना
माखजन l वार्ताहर : विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबवावा यासाठी ५ मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व हेतू साध्य व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत यांनी शाळा भेटींना सुरवात केली आहे.याअंतर्गत सौ सावंत यांनी गणपतीपुळे मराठी शाळा,व मालगुंड हायस्कुल ला भेट दिली.प्रत्यक्ष ३ री व ५ वीच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली.विद्यार्थ्यांची क्षमता जाणून घेतली.यामध्ये काही विद्यार्थी प्रगत असल्याचे आढळले तर काही चुका करताना आढळले. यावेळी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत गणित समजून, गणित विषयाची रुची निर्माण व्हावी यासाठी शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत यांनी रंजक तासिका ही घेतली.व विद्यार्थ्यांकडून अधिक सराव घेऊन निपुण महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या.
राज्यातील दुसरी ते पाचवी च्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
याचाच एक भाग म्हणजे ५ एप्रिल रोजी सर्व शाळांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम घेण्यासाठी शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत यांनी आदेशित केले आहे.५ मार्च च्या शासन निर्णयास अनुसरून,रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक अनुदानित,अंशतः अनुदानित स्वयंअर्थसहाय्यीत ,सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये चावडी वाचन घेण्यात यावे असे सूचित करण्यात आले आहे.विशेषतः हे चावडी वाचन इयत्ता ५ वी साठी असणार आहे.चावडी वाचन करताना चे फोटो शाळेचे नाव ,तालुका ,एकूण पाचवी चा पट, त्यापैकी किती विद्यार्थी ७५% क्षमता पूर्ण करतात? त्यामध्ये भाषेत वाचन,लेखन,व गणित विषयात संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया यांचा समावेश असेल ,तसेच एकूण विद्यार्थी क्षमता पूर्ण करणाऱ्यांची टक्केवारी,शेरा अशा स्वरूपात स्पष्ट अहवाल ८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष कार्यालयात जमा करावा असे आदेशात नमूद आहे.
शिवाय चावडी वाचन कृती कार्यक्रमासाठी नियमित पाचवी इयत्तेला शिकवणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावनिहाय नेमणूक मुख्याध्यापकांनी करावी असे पत्रात म्हटले आहे.












