शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणार

भाजप वर्धापदिन निमीत्ताने जिल्ह्यात ६ रोजी विविध उपक्रम

चिपळूण (प्रतिनिधी):– भाजपच्या वर्धापदिन निमीत्ताने जिल्ह्यात ६ रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामिण भागातही हे उपक्रम राबवले जाणार आहेत. भाजपाच्या सदस्य नोंदणीला जिल्ह्यांत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक कार्यरत आहे. त्यामुळे पंचायत समिती अथवा नगरपरिषद मधील विविध शासकीय योजनांचा लाभ जनतेला होण्यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रीयपणे कार्यरत राहतील, असे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजप पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वपुर्ण बैठक शुक्रवारी शहरातील शिक्षक भवन येथे जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती. याबैठकीपुर्वी भाजपच्या वर्धापनदिन निमीत्ताने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

ते म्हणाले, भाजपच्या वर्धापन दिनानिमीत्ताने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते घरघरांत ध्वजारोहन करून हा दिवस साजरा करणार आहेत. यादिवशी भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान देखील केला जाणार आहे. तसेच याच दिवशी रामनवमी निमीत्त विविध मंदिरात लाडू वाटपही करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ एप्रील रोजी कोकणचे नेते व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवस निमीत्ताने रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देवरूख येथील मराठा भवन मध्ये राणे शुभेच्छा स्विकारणार आहेत. याचदिवशी संगमेश्वरात बैलगाडा स्पर्धेचेही आयोजन केले आहे.
भाजपने राज्यात दिड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट पुर्ण केले आहे.

जिल्ह्यातही भाजपने चांगल्या प्रकारे सदस्य नोंदणी मोहिम राबवली. त्यानुसार रत्नागिरी विधानसभा मतदार संघात ३० हजार, चिपळूणमध्ये १७ हजार तर राजापूरमध्ये १६ हजार सदस्य नोंदणी झाली आहे. संघटना बांधणी बरोबरच तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष सक्रीय झाला असून पदाधिकारी त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. नगरपरिषद, पंचायत समितीमध्ये जनतेसाठी असलेल्या विविध योजना लोकांपर्यत पोहोचवण्यात येणार असून त्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी देखील भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. महिला बालकल्याण, मागासवर्गीय, दिव्यांग आदी घटकांसाठी असलेला निधी प्रशासक कोणत्या पद्धतीने खर्च करते, याचाही आढावा घेतला जात असल्याची माहिती सांवत यांनी दिली.

यावेळी जिल्हा सचिव अमित केतकर, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, , शहराध्यक्ष राम शिंदे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.