रत्नागिरी ः प्रतिनिधी : नुकसान करण्याच्या हेतूने फणसवळे येथे तब्बल 50 हजारांचे तयार न झालेले आंबे काढल्याप्रकरणी 5 जणांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. सुमारास घडली.
भास्कर बाळकृष्ण दळवी, प्रसाद भास्कर दळवी, शुभांगी भास्कर दळवी, सुनित शंकर दळवी, विष्णू बाळकृष्ण दळवी (सर्व रा.फणसवळे दळवीवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात शरद गंगाराम दळवी (58,रा.फणसवळे दळवीवाडी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी आणि संशयित आरोपी हे एकाच वाडीत रहातात. गुरुवार 3 एप्रिल रोजी फिर्यादी व त्यांचा चुलत भाउ हे दोघे त्यांच्या फणसवळे येथील सामाईक बागेत रखवाली करत होते. तेव्हा संशयितांनी संगनमताने त्यांच्या बागेत प्रवेश करुन बागेतील विक्री करता तसेच खाण्याकरता तयार न झालेले तब्बल साडे आठ क्रेट आंबे काढले. त्यामुळे फिर्यादीचे अंदाजे 15 पेटी आंब्याचे असे एकूण 50 हजार रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी संशयितांविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 189,190,329,(1),324(1),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











