सचिन रेडकर, सिंधुदुर्ग
सन १९९०. मी त्यावेळी मालवण पॉलिटेक्निकच्या पहिल्या वर्षात होतो. आम्ही पाच मित्र देऊळवाडा येथे चेक पोस्ट जवळ एका घरात भाड्याने राहत होतो. रोजच्या प्रमाणे सायकांळी नारायण मंदिरा लगत एका हॉटेल मध्ये आम्ही चहा पित बसलो होतो. एवढ्यात एक विजयी मिरवणूक तेथे आली. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. बँजो व ढोल ताशांच्या तालावर त्या मिरवणुकीत गुलाल उधळला जात होता. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा व आवाज कुणाचा ही ललकारी दिली जात होती. याच वेळी एका ओपन जीपवर पांढरा शर्ट, पांढरी विजार असा शुभ्र पांढरा पेहराव केलेले विजयी उमेदवार उपस्थितांच्या शुभेच्छा घेत होते. ते देखणे व राजबिंडे रूप आम्ही पाहतच राहिलो. ते होते कोकणचे भाग्यविधाते तेव्हाचे नवनिर्वाचित आमदार व विद्यमान खासदार नारायणराव राणे अर्थात साहेब.
साहेबांच्या त्या दिमाखदार एन्ट्रीची छाप कायमची हृदयावर कोरली गेली आणि माझ्यासारखे त्या वेळचे अनेक तरुण साहेबांच्या अक्षरशः प्रेमात पडले. शिवसेना ही चार अक्षरे आमच्या केवळ ऐकिवात होती पण साहेबांच्या कोकणातील त्या एन्ट्री नंतर हीच शिवसेना कोकणातील घराघरात पोहोचली.
आमचं घराणं तसं काँग्रेसचं. माझे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात उप अभियंता कार्यालय इलेक्ट्रिकल विभागात सावंतवाडी येथे नोकरीला होते. १९८९ मध्ये त्यांचे अपघाती निधन झाले. ते काँग्रेसी विचारधारेचे होते. नोकरीमुळे सक्रीय राजकारणात सहभागी होता येत नसले तरीही आमच्या भागातील राजकारण तेच हाताळत असत. त्यामुळे बालपणापासूनच आम्हाला देखील राजकारण व समाजकारणाचे बाळकडू मिळाले होते.
त्याच दरम्यान आमच्या मळगांव गावांत शिवसेनेची पहिली शाखा आम्ही एका घरात स्थापन केली. आम्ही मोजकेच तरुण त्यात सहभागी होतो. गावात शिवसेनेचा विचार देखील नव्हता. मात्र, साहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन आम्ही सेनेची शाखा स्थापन केली व एक एक जण आम्हाला जोडत गेला व लवकरच मळगांव गावात त्या काळी शिवसेनेचा पहिला सरपंच तेजपाल सावळ यांच्या रुपाने आम्ही खुर्चीत बसवला.
सावंतवाडी तालुक्यात त्यावेळी काँग्रेसचाच प्रभाव होता. जनता दलाची विचारसरणी मागे पडू लागली होती. मात्र त्या विचारांची मंडळी हळूहळू तुमच्याकडे आली व साहेबांच्या मार्गदर्शनात शिवसेनेने दिमाखदार वाटचाल चालू केली.
मी त्यावेळी शिवसेनेचा गट प्रमुख होतो. त्यानंतर माझी उपविभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. साहेबांची सभा मग ती कुठेही असो मी ती चुकवली असे कधीच झाले नाही. साहेबांच्या विचारांचा पगडाच तेवढा मोठा होता.
एकदा साहेबांचा दोडामार्ग दौरा होता. त्यावेळी ते विरोधी पक्षनेते होते. त्याकाळी दोडामार्गात हत्तींचं आगमन झालं होतं व मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. विरोधी पक्ष नेते या नात्याने त्या भागाची पाहणी करण्याकरिता ते आले होते. त्यावेळी शिवराम दळवी सावंतवाडीचे आमदार होते. मी त्या दौऱ्यात नेहमीप्रमाणे सहभागी झालो होतो. पाहणीनंतर दुपारी साहेब जेवायला बसले. सर्वांना जेवण होतं. मी साहेबांच्या एका बाजूला कोपऱ्यात उभा होतो. साहेबांच्या ते लक्षात आलं. त्यांनी मला जवळ बोलवून घेतलं. तू जेवत नाहीस का असं विचारलं. मी म्हणालो मी शाकाहारी आहे व जेवण फक्त मांसाहारी आहे. ते कमालीचे चिडले व तिथल्या पदाधिकाऱ्याची कानउघाडणी केली. त्यांचं जेवण झालं होतं व त्यांच्यासमोर काजूगर व केळी होती. त्यांनी त्यातले काजूगर व केळी मला दिली व उपाशी राहू नको हे खा असं सांगितलं. माझ्यासाठी तर ते देवच होते. त्यांचा ते प्रेम पाहून डोळ्यात अक्षरशः अश्रू तरारले मी ती आठवण कधीही विसरू शकलो नाही.
मध्ये एकदा ते निरवडे गावात एका जल योजनेच्या उद्घाटना निमित्त आले होते. त्यावेळी झाराप पत्रादेवी महामार्गासाठीचा संघर्ष सुरु होता. तब्बल २२ वर्षे हा संघर्ष आम्ही करत होतो. त्या कार्यक्रमा दरम्यान मी साहेबांना एक निवेदन सादर केलं. शेकडो शेतकऱ्यांच्या सह्यांचं ते निवेदन होतं. महामार्गासाठी केवळ २०० रुपये प्रतिगुंठा दराने आम्ही जमिनी दिल्या आहेत त्यामुळे महामार्ग हा सावंतवाडी शहरातून नव्हे तर गावातूनच जावा अशी आग्रही मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली होती व त्यात आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता. साहेबांनी निवेदन वाचल्यावर मला कणकवलीत बोलावून घेतलं. हॉटेल निलम कंट्रीसाईडवर भेट झाली. ते म्हणाले तुमची मागणी रास्त आहे पण आंदोलन हा मार्ग नाहीय. लवकरचं हे काम मार्गी लागेल काळजी करू नका. त्यांच्या आश्वासनानंतर सकारात्मक भावनेने आम्ही माघारी वळलो व त्यानंतर लवकरचं झाराप पत्रादेवी महामार्गाचे काम देखील सुरु झाले. शब्दाला जागणारा असा नेता आम्ही आयुष्यात कुठेही पाहिला नाही. ते आमचे केवळ दैवत नव्हते तर वडिलांसमान होते व आजही आहेत.
त्यानंतर २००५ मध्ये साहेबांनी शिवसेना सोडली. तो दिवस आमच्यासाठी खूप मोठा क्लेशदायक होता. आम्ही त्यावेळी कायम शिवसेनेच्या सावंतवाडीतील शाखेत जमत असू. दुसऱ्या दिवशीही आम्ही नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या शाखेत गेलो. साहेबांवर झालेल्या अन्यायामुळे आम्ही कमालीचे संतप्त झालो होतो. दुपारी एकच्या सुमारास आम्ही सावंतवाडीची शाखा शटर ओढून बंद पाडली आणि त्याला टाळे ठोकले. याचवेळी चुकून आमच्यातील एकाने वंदनीय बाळासाहेबांचं पोस्टर काढलं. दुसऱ्या दिवशीच्या एका दैनिकात त्याची फोटोसहीत बातमी छापण्यात आली. साहेबांना ते समजतात त्यांनी आम्हाला फोन करून खडे बोल सुनावले. शाखा बंद केली ते ठीक आहे मात्र साहेबांच्या प्रतिमेला हात लागता कामा नये असा सज्जड इशारा त्यांनी आम्हाला दिला. त्यांचे मोठ्या साहेबांवर असलेले प्रेमच त्या घटनेने अधोरेखित झाले होते.
साहेबाचं घर जळलं तो दिवस देखील आमच्यासाठी जिवनातील काळा दिवस होता. त्या घटनेनंतर आम्ही शेकडो शिवसैनिक सावंतवाडीत जमा झालो होतो. त्यावेळी मी शिवसेनेचा उपविभाग प्रमुख होतो. माझे अनेक सहकारी माझ्या सोबत होते. कणकवलीत जायचे ठरले होते. मात्र, एक फोन आला की कोणीही कणकवलीत जायचे नाहीय. त्यामुळे आम्ही साहेबांच्या आदेशाची वाट पाहत थांबलो होतो. साहेब तेव्हा मराठवाडा दौऱ्यावर होते. ते विमानाने गोव्यात आले व तिथून कणकवलीत जात असताना सावंतवाडीत आम्ही शिवसैनिकांनी त्यांची बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्याजवळ भेट घेतली. त्यावेळी ते प्रचंड चिडले. इथे माझे स्वागत करायला थांबलात का ? अरे माझं घर जळतयं तिथे कणकवलीत जाऊन एक एक तांब्या पाणी मारला असता तर मानल असतं. साहेबांचे ते शब्द काळीजावर आघात करून गेले.
पुढे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे पोटनिवडणूक जाहीर झाली. सावंतवाडी तालुक्याचे तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत वेंगुर्लेकर व ज्येष्ठ पदाधिकारी बाब्या पांढरे यांच्या नेतृत्वाखाली मी व माझे काही सहकारी देखील त्या निवडणूकीच्या प्रचारात सहभागी झालो होतो. कळसुली जिल्हा परिषद मतदासंघाची जबाबदारी आमच्यावर होती. त्यावेळी झालेल्या एका राजकीय घटनेनंतर तो मतदारसंघ संवेदनशील होता. त्याच मतदार संघात प्रचाराची जबाबदारी आमच्यावर होती. घराघरात चिन्ह पोहोचवण्याचे काम आम्हाला दिले होते. रोज सकाळीच आम्ही सर्वजण सावंतवाडीतून निघायचो. रात्री एका एका वाडीवर बैठक व्हायची कधी तरी साहेबांची कॉर्नर सभा व्हायची. साहेब आम्हाला रोज सूचना करायचे व त्या प्रमाणे आम्ही काम करत होतो.
त्यावेळी स्व. बाळा वळंजू आमच्यासोबत होते. शिवसेनेचे तत्कालीन सर्व खासदार आमदार व नगरसेवक निवडणूक प्रचारात उतरले होते. एकदा बाळाच्या सोबत आम्ही त्यांच्या सर्व गाड्यांची हवाच काढून टाकली होती व प्रचारातीलही. क्रांती हॉटेल समोर लावलेल्या सर्व गाड्या चक्काचूर केल्या होत्या. साहेबांवर अन्याय झालाय व कोकणावर झालेला हा अन्याय आहे या एकाच विचाराने प्रभावित होऊन सर्वजण काम करीत होते.
तो निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी निवडणूक होती. रात्रभर खडा पहारा द्यायचा होता. ओसरगांव तिठ्यावर ( त्या काळी महामार्ग नव्हता ) मी व माझे सहकारी काही मित्र आम्ही उभे होतो. रात्री २ वाजले काही जण पांगले. झोपायला गेले मात्र मी व काही पण तसेच उभे होतो. त्याच वेळी साहेबांची गाडी आली. साहेबांनी गाडी थांबवून आमची विचारणा केली. सर्व कुशल असल्याचे सांगितल्यावर आम्हाला काळजी घ्या, अलटून पलटून थांबा असे सांगून ते निघाले. त्यांच्या लेखी आम्ही कोणीच नव्हतो पण कार्यकर्त्यांची काळजी घेणारा तो नेता नव्हे तर देवमाणूस होता.
साहेब मोठ्या मताधिक्याने निवडून आले व आम्ही भरून पावलो. साहेबांच्या आदेशाने आम्ही काम करायचो पण पुढे पुढे कधीच केले नाही. त्यांचा आदेश व त्याची अंमलबजावणी हाच आमचा ध्यास होता.
साहेबांचा प्रत्येक शब्द हा आमच्यासाठी परवलीचा असायचा. त्यामुळेच जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाज कल्याण सभापती कृष्णा जाधव यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या तळवडे जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत त्यावेळी साहेबांनी कणकवलीतील सुमेधा पाताडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्या उमेदवारीला तत्कालीन काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. बंडखोरीही झाली. मात्र साहेबांचा आदेश मानून आम्ही प्रचारात सहभागी होत जोर लावून तब्बल दीड हजार मताधिक्याने त्या जागेवर विजय मिळवून दिला. मी त्यावेळी काँग्रेसचा उप विभागीय अध्यक्ष होतो. त्या विजयानंतर ओम गणेश बंगल्यावर साहेबांनी कौतुकाची दिलेली थाप खूप बळ देऊन गेली.
पुढे २००७ साली राजकारणाला पूर्णविराम देऊन मी दैनिक प्रहार मध्ये पूर्ण वेळ पत्रकारितेत सहभागी झालो.
साहेब तरीही कधीही भेटले की आस्थेने विचारपूस करतात तेच आमच्यासारख्या त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी खूप आहे. कालच्या त्यांच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी एक जबाबदारी माझ्याकडे दिली होती ती देखील मी प्रामाणिकपणे पूर्ण केली. ‘साहेब ही तीन अक्षरे’च आमच्या जीवनाचा मंत्र होता व आहे व जिवनाच्या अंतापर्यंत कायम राहील.












