विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे समर्थ नेतृत्व ..

नरेंद्र मोहिते l राजापूर :कोकणच नव्हे तर राज्य आणि देशाच्या सामाजिक, राजकिय पटलावर आपल्या कार्यकतृत्वाने आगळा वेगळा ठसा उमटविणारे नेतृत्व म्हणून खासदार नारायण राणे यांची ओळख आहे. पाच दशकांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या खा. राणे यांचे सारे जीवनच संघर्षमय आहे. मात्र याच संघर्षातुन काम करत आपल्याला मिळालेल्या प्रत्येक पदाचा वापर हा माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी झाला पाहिजे हा एकच विचार मनात असणारे आणि विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे एक समर्थ असे नेतृत्व म्हणजे खासदार नारायण राणे होत.

शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेता ते मंत्री, मुख्यमंत्रीपदी काम करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळात सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री म्हणून काम करत त्यांनी या मंत्रीपदाच्या माध्यमातुन राज्य आणि देशपातळीवर आपल्या कार्याचा आगळा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या कार्यकाळातील कामाची दखल राष्ट्रपती, पंतप्रधान व अर्थमंत्र्यांनी लोकसभेत घेत त्यांच्या कार्याचा जणू सन्मानच केला. मिळालेल्या प्रत्येक पदाला न्याय देऊन काम करताना या पदांच्या माध्यमातुन सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न खा. राणे यांनी केला.

सन २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातुन भाजपाने नारायण राणे यांना रिंगणात उतरविले आणि कोकणवासीयांनी पुन्हा एकदा नारायण राणे यांच्यावर असलेले प्रेम सिध्द करत त्यांना लोकसभेत पाठविले. लोकसभेतील या विजयामुळे संविधानिक चौकटीत असलेल्या लोकशाहीच्या विविध सभागृहांमध्ये ज्या काही मोजक्या महनिय अशा लोकांनी काम केले, ज्यांना लोकांनी निवडून देत त्या सभागृहांमध्ये काम करण्याची संधी दिली अशा लोकप्रतिनिधींच्या यादीत खा. नारायण राणे यांचे नाव कोरले गेले आहे. आपलं सारं जीवन समाजासाठी आहे अशा भावनेतुन कोकण, राज्य आणि देशाच्या सर्वांगिण विकासाचा ध्यास घेऊन काम करणारे एक कणखर असे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. कोकणतीही राजकिय पार्श्वभूमी नसतानाही एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात पोहचत खा. राणे यांनी मिळविलेले यश हे निश्चितच प्रेरणादायी आणि दिशादर्शक असे आहे.

खा. राणे हे एक आक्रमक आणि लढाऊ असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा सारा राजकीय प्रवास एक झंझावात आहे. ते कोणत्या पदावर असोत की नसोत, सरकारमध्ये असोत की नसोत, ते नेहमीच चर्चेत असतात. अन्यायाविरोधात पेटून उठणे हा त्यांचा स्वभाव आहे. कितीही संकटे आली तरी त्याला धीराने तोंड देत त्यांनी त्यांचा सामना केला.

मंत्री, विरोधीपक्ष नेता, मुख्यंमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार म्हणून काम करताना त्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणांनी आणि केलेल्या कामाने विरोधकांनाही त्यांची दखल घ्यावी लागते. कोकणातील कोणताही प्रश्न असो, तो राज्य पातळीवरचा असो वा देशपातळीवरचा असो खा. नारायण राणे यांच्याकडे गेला म्हणजे त्याला हमखास न्याय मिळणारच ही खात्री प्रत्येकाला वाटते. राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री आणि आता लोकसभेत खासदार म्हणून काम करताना त्यांनी कोकणातील महामार्ग, रेल्वे, विमानतळ, पर्यटन यांसारख्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

खा. राणे यांनी कायमच विकासाचे राजकारण केले. सन २००९ मध्ये राजापूर तालुक्यात जैतापूर येथे प्रस्तावित असलेल्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला प्रखर विरोध असताना त्याचे जाहिर समर्थन करून हा प्रकल्प कसा योग्य आहे हे स्थानिकांना पटवून दिले. तर एवढयावर न थांबता त्यांनी शेतकऱ्यांना हरयाणाच्या धर्तीवर हेक्टरी साडेबावीस लाखाचा वाढीव जमिन मोबदला मिळवून दिला. त्याच पध्दतीने त्यांनी विकासाच्या आणि रोजगाराच्या मुद्यावर प्रारंभी नाणार व त्यानंतर बारसू येथे प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचेही समर्थन करत जर प्रकल्प आले नाहीत, औद्योगिक क्रांती झाली नाही तर मग विकास कसा होणार असा सवाल उपस्थित करून कोकणी जनतेने आपली मानसिकता बदलून अशा प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे असेही सांगितले. कोणत्याही राजकिय फायद्या तोटयाचा विचार न करता, राजकारण न करता कोकणी जनतेचे हित, स्थानिकांना रोजगार आणि कोकणची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे हा एकच दृष्टीकोन ठेवून त्यांनी या अशा प्रकल्पांचे कायमच जाहिरपणे समर्थन केले व आजही करतात. त्यामुळे जे काही असेल ते उघडपणे कशाचाही आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता करायचे असा बेधडक स्वभाव असलेले नेतृत्व म्हणजे नारायण राणे होत.

आपल्या पन्नास वर्षापेक्षा अधिक काळाच्या या राजकिय व सामाजिक जीवनात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला, आधार दिला. त्यांच्याकडे येणारी व्यक्ती कोणत्याही जाती धर्माची असो, कोणत्याही पक्षाची असो ते त्यांनी कधीच पाहिले नाही. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे, त्याला न्याय देणे ही एकच भूमिका आणि दृष्टीकोन ठेऊन त्यांनी मदत केली. त्यामुळे त्यांच्याकडे मदतीसाठी आलेला माणूस कधीही रिक्त हस्ते परत जात नाही अशी त्यांची ख्याती आहे.

त्यांच्या राजकीय जीवनात अनेक कठीण प्रसंग आले पण मग शिवसेना पक्ष सोडणे असो, सन २०१४ मध्ये मालवण विधानसभा मतदार संघातून झालेला पराभव असो. त्यांनी या प्रसंगाचा अत्यंत धिरोदत्तपणे सामना केला. कोकणातील जनतेने कायमच आपल्याला भरभरून प्रेम दिलं असे खा. राणे सांगतात. त्याची प्रचिती २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वांना आली. आमच्या दादांना लोकसभेत पाठवायचेच असा ध्यास घेवून त्या काळात प्रत्येकाने काम केले. आणि आपला हक्काचा खासदार लोकसभेत पाठवला. आम्ही चालवू हा पुढे वारसा या उक्तीप्रमाणे खासदार राणे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे दोन्ही सुपुत्र जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून आज धडाडीने काम करीत आहेत. त्यामुळे कोकणात आणि महाराष्ट्रात राणे पॅटर्ण आणि राणे फॅक्टर ची चर्चा होताना पाहायला मिळत आहे.

कोकणात शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, कोकणात चांगली आरोग्य सेवा निर्माण झाली पाहिजे, कोकणात विमानतळ झाले पाहिजे, कोकणात अशा प्रकारे प्रकल्प आले पाहिजेत व यातुन कोकणातील बेरोजगरा तरूण तरूणींना रोजगार मिळाला पाहिजे, कोकणातील दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, कोकणातील उपलब्ध साधनसामुग्रीच्या माध्यमातुन इथल्या पर्यटन विकासाला चालना मिळून देश व परदेशातील पर्यटक कोकणात आला पाहिजे असा ध्यास घेऊन ते काम करत असतात. त्यांच्या या कामाची दखल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतात हा आम्हा तमाम कोकण वासीयांचा एक सन्मानच आहे.

त्यांच्या या प्रवासात त्यांना पत्नी सौ. निलमताई राणे, सुपुत्र आमदार निलेश राणे, राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे व संपुर्ण राणे कुटुंबीय त्याच बरोबर त्यांच्या राजकिय जीवनात प्रारंभीपासून आजपर्यंत त्यांच्या सोबत असलेले त्यांचे कार्यकर्ते, आणि कोकणची जनता यांचे भक्कम पाठबळ त्यांना मिळाले.

आपल्या कार्यकतृत्वाने देशाच्या राजकिय पटलावर आपला वेगळा ठसा उमटवत कायमच कोकणी जनतेच्या हितासाठी समर्पक भावनेने काम करत विकासासाठी झटणाऱ्या आदरणीय खासदार नारारण राणे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.।।

——————————————————-