कातकरी समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार : ॲड. परिमल नाईक

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कातकरी समाजातील मुलांच्या वस्तीगृहात कपड्यांचे वाटप

सावंतवाडीतील भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा पुढाकार

सावंतवाडी । प्रतिनिधी : कातकरी समाजातील मुलांसाठी सुरू असलेले वसतिगृह हे निश्चितच मोठे काम आहे. कातकरी समाज हा आपल्या समाजातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि या समाजाच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही मुलं खूप हुशार आणि प्रतिभावान आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते नक्कीच समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. त्यामुळे
खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या मुलांसाठी नक्कीच प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सावंतवाडी नगर परिषदेचे माजी सभापती ॲड. परिमल नाईक यांनी दिले.
माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीतील भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी कातकरी समाजाच्या मुलांसाठी कुडाळ वेताळ बांबार्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांना भेटवस्तू आणि कपड्यांचे वाटप केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. त्यांनी वसतिगृहाच्या प्रशासनाचे कौतुक करत त्यांना सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी सभापती तथा माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, माजी नगरसेवक गुरूदास मठकर, भाजपा शहर मंडळ अध्यक्ष अजय गोंदावळे, वसतिगृह संचालक उदय आईर, एन.जी.ओ. भार्गव शिरोडकर, सौ. शिरोडकर आणि वसतिगृहातील मुले उपस्थित होते.