धोकादायक झाडांच्या फांद्या कटाईस खेड ‘महावितरण’कडून सुरुवात

खेड(प्रतिनिधी)पावसाळ्यात वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या धोकादायक फांद्या छाटून वीजपुरवठा अखंडितपणे सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने येथील महावितरणने मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. वीज जोडण्यांना धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यास सुरुवात झाली असून यासाठी शहरासह ५० हून अधिक गावांमध्ये वीज कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कामगार सक्रिय झाले आहेत.
खेड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाचही उपविभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मान्सूनपूर्व कामांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. खेड उपविभांगांतर्गत शहरासह ग्रामीण-२ व ३ व भरणे विभागात ५०हून अधिक, खेड शहरासह ग्रामीण २मध्ये फुरुस, दयाळ, सुकदर, सुसेरी, पोयनार, दस्तुरी, चिंचघर आदी १६, ग्रामीण २मध्ये अलसुरे, भडगाव, शिवतर, मुरडे, भोस्ते आदी १६ गावे तर भरणे विभागात २२ गावांमध्ये मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे.
महावितरणचे विभागीय कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर, खेड उपविभागाचे अभियंता दीपक सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील ५३ तांत्रिक कर्मचारी या कामात गुंतले दिसून येत आहेत. दोन ठेकेदारांमार्फत १० ते १२ कंत्राटी कर्मचारीही सहभागी झाले आहेत.