खेड नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामास गती

साफसफाईसाठी स्वच्छता विभाग सक्रिय,
खेड(प्रतिनिधी)नगर परिषदेच्या मान्सूनपूर्व कामांना वेग आला असून शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांलगतची गटारे व नाल्यांची साफसफाई करण्यात येणार आहेत. यामध्ये खेड-दापोली मार्गालगतची तुंबलेली गटरे स्वच्छ करुन मोकळी करण्यात आली आहेत.
नगरपरिषद हद्दीतील १७ प्रभागांमधील कचरा नियमित उचलला जात असला तरी काही कचरा-गाळाने मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांलगतच्या गटारे व नाल्यांत साचत आहे. गांधीचौकातील मुख्य नाला गेल्या काही महिन्यांपासून सांडपाण्याने तुंबून त्यावर प्लास्टिकयुक्त कचऱ्याचा थर साचला आहे. तसेच शिवतररोड, तहसील, वाणीपेठ, डाकबंगला, बाजारपेठ, टेलिफोन एक्ससेंज आदी ठिकाणची गटारे तुंबून त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. याचा तेथील रिक्षा व हॉटेल्स व्यावसायिक, दुकानदार, ग्राहक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने मुख्य व अतंर्गत रस्त्यांलगतची गटारे-नाले स्वच्छ करून मोकळी करण्यावर भर देत खेड-दापोली मार्गावरील जुन्या पोलीस वसाहतलगतची गटारे मोकळी केली.
दरम्यान, शहरातील एसटी आगार, स्वरुपनगर येथील गटारे साफ करण्याची कामे नुकतीच हाती घेण्यात आली. याठिकाणी अडथळा ठरणाऱ्या महावितरणच्या भूमिगत वाहिनीबाबत पत्र देण्यात येणार आहे. गांधीचौकातील तुंबलेल्या मुख्य नाल्याची देखील जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात येणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक विनायक सावंत यांनी सांगितले.