खराब हवामानामुळे वॉटर स्पोर्टस बंद; पर्यटन संचालयाने बजावले आदेश
रत्नागिरी | प्रतिनिधी ; पावसाळा जवळ येऊ लागल्याने वातावरणात बदल होत आहे. खराब हवामानामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जल व साहसी क्रीडा पर्यटन 26मे पासून बंद ठेवण्याच्या सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत. पर्यटन हंगाम संपतासंपता हे आदेश आल्यामुळे अखेरच्या टप्प्यात जल पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांच्या हिरमोड झाला आहे. कोकण किनारपट्टीवरील साहसी क्रीडा प्रकारांना त्यामुळे ब्रेक लागला आहे.मागील काही वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील अनेक किनारपट्ट्यांवर साहसी क्रीडा प्रकार, नौकानयन सुरु करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, मालगुंड, नेवरे-काजीरभाटी, आरेवारे याठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यावर्षी उशिराने सुरु झालेला पर्यटन हंगामात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात वाढली होती. विशेषत: जलपर्यटनाला वाढता प्रतिसाद मिळत होता. सध्या वॉटर स्पोर्टस चालवणार्या संस्थांना 31मे पयर्र्त परवानगी देण्यात आली होती.
मान्सून जूनमध्ये सक्रीय होण्याची शक्यता असल्याने, आतापासूनच हवामानात बदल होऊ लागला आहे. यामुळे उत्साही पर्यटकांना दुर्घटनेला सामोरे जावे लागू नये यादृष्टीने पर्यटन संचालनालयाचे सहाय्यक संचालक रविंद्र पवार यांनी सर्व वॉटर स्पोर्टस संस्था चालकांना शुक्रवार 26 मे ते 31 ऑगस्टपर्यंत जालपर्यंटन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.याबाबत आदेश मिळाल्याने शनिवार 27 मेपासून जलपर्यटन बंद ठेवण्यात आले आहे.
चौथा शनिवार व रविवार असल्याने पर्यटक मोठ्याप्रमाण जिल्ह्याच्या किनारपट्टीवर आले होते. ऐन हंगामात हा आदेश आल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.










