पाली | वार्ताहर तालुक्यातील नाणीज गावचे सरपंच विनायक शिवगण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांना शासनाकडून सरपंच म्हणून मिळणारे मानधन प्रत्येकी रुपये ८००० याप्रमाणे रुपये १६,००० रक्कम गावातील दोन्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना मदत म्हणुन दान केली आहे.यातूनच त्यांनी आपल्या राजकीय जीवनात काम करीत असताना समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
सरपंच विनायक शिवगण हे पाली विभागात सामाजिक क्षेत्रात नेहमीच मदतीसाठी तत्पर असतात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही त्यांनी नेहमीच शाळांना सहकार्य केले आहे. आता त्यांनी ‘मिशन आपुलकी’ या उपक्रमांतर्गत शाळेला देणगी देऊन समाजाला एक वेगळी दिशा दाखवली आहे. ग्रामीण भागातील मराठी शाळा या दर्जेदार होण्यासाठी आपण कर्तव्य भावनेतून शाळेला मदत केली पाहिजे ही बाब प्रत्येकाने लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच इतरांनाही प्रेरणा देणारा आहे.
या प्रेरणादायी उपक्रमावेळी नाणीज क्र. १ शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निशा बेंडल, तसेच नाणीज गावडेवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका वैष्णवी शिवगण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रिद्धी हतपले, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिक्षा गावडे यांच्यासह दोन्ही शाळांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक मनोजकुमार खानविलकर यांनी केले.











