तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची झळ, ग्रामस्थ हैराण

तालुक्यातील तीन गावे आणि पाच वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई

अन्य काही गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता कमी अधिक

लांजा (प्रतिनिधी) दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ यामुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. सद्यस्थितीत तीन गावे आणि पाच वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.पुढील काही दिवसांत या पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर दरवर्षी लाखो रुपये खर्च करत असताना देखील ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे हे चित्र कधी बदलणार? असा सवाल माजी पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ देवधेकर यांनी उपस्थित केला आहे.लांजा तालुक्यातील काही गावांमध्ये दरवर्षी होणारी पाणीटंचाई हे नित्याचीच बाब बनली आहे. दरवर्षी सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागतात त्या चिंचुर्टी धावडेवाडीला. नोव्हेंबर मध्येच या भागात तीव्र पाणीटंचाई सुरू होते. चिंचुर्टी धावडेवाडी ही डोंगर माथ्यावर वसलेली असल्याने या ठिकाणच्या ग्रामस्थांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. मात्र टॅंकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा अपूरा असल्याने एप्रिल, मे महिन्यात या ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे.

सद्यस्थितीत लांजा तालुक्यात तीन गावे यामध्ये पालू, कोंडगे आणि कोचरी या गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. या गावांमधील चिंचुर्टी धावडेवाडी, धनगरवाडी,भोजवाडी, धनगरवाडी आणि ढोमवाडी या गावे व वाड्या यांना तीव्र पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. या पाणी टंचाई संदर्भात गावातून लांजा पंचायत समिती प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे अर्ज आले असून त्यानुसार या गावे आणि वाड्यांना पंचायत समितीच्या एका टँकरद्वारे सद्यस्थितीत पाणीपुरवठा सुरू आहे .मात्र हा पाणीपुरवठा अपूरा असल्याने येथील ग्रामस्थांचे पुरते हाल होत आहेत.पाण्याअभावी गावात दाखल झाले चाकरमानी देखील पाणीटंचाईमुळे मुंबईला परतत असल्याचे चित्र दिसून येत आहे .इतकी भीषण पाणीटंचाई या गावांमध्ये दिसून येत आहे. त्याचप्रमाणे वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने पाणीटंचाईच्या गावे आणि वाड्या यामध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे लोक चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत. पाण्यासाठी वणवण करावे लागणारी जनतेला पावसाची प्रतीक्षा राहिली असून आता या संकटातून वरुणराजाच मुक्त करणार आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे पाऊस लांबला तर यापेक्षा भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान रस्ते, फुल, साकव, पाखाड्या या कामासाठी आटापिटा करणाऱ्या आणि श्रेयवादासाठी धडपडणाऱ्या लोकप्रतिनिधींनी भविष्यात लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी प्रभावी उपायोजना व अंमलबजावणी प्रयत्न केल्यास प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेणेकरून तालुक्यातील पाणीटंचाई दूर होईल त्या दृष्टीने लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही देखील जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य सिद्धार्थ देवधेकर यांनी केली आहे.