रत्नागिरीत पुन्हा सापडले गोवंशाचे अवशेष

नवजात गोवंशाची हत्या करून खेडशी गयाळवाडी शेजारी अवशेष टाकल्याचा संशय 

जनमानसात खळबळ आणि तीव्र संताप

अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल 

रत्नागिरी : प्रतिनिधी 

रत्नागिरी शहरानजीच्या खेडशी गयाळवाडी येथील मुकादम हॉस्पिटलच्या शेजारी एका नवजात गोवंशाचे अवशेष सापडल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नवजात वासराचे हे अवशेष तिथे कापून टाकले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस स्थानकात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून गोवंशांची तस्करी आणि हत्या याचे प्रकार कोकणपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमी वरती पुन्हा एकदा खेडशि गायळवाडी येथील मुकादम हॉस्पिटलच्या शेजारी नवजात वासराच्या शीर आणि अर्धवट तुटलेले पुढचे दोन पाय हे अवशेष शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आढळून आले. ही माहिती मिळताच तेथे हिंदू संघटनांचे पदाधिकारी, नागरिक, गोरक्षक आणि त्या पाठोपाठ पोलीस दाखल झाले. या प्रकरणी घटनास्थळीच या अवशेषांचा पंचनामा केला पाहिजे अशी मागणी गोरक्षकानी केल्यानंतर तेथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. हे अवशेष एका नवजात वासराचे असल्याचे यावेळी स्पष्ट झालं. तसंच ते कोणीतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी कापून तेथे टाकले असल्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी विशाल पटेल यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध तक्रार दिली असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 299, 325, 238 तसेच महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5a, 5b आणि 9 यानुसार 19 एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून 44 मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र गेल्या महिन्यांपासून गोवंशांची तस्करी आणि अमानुष हत्येचे प्रकार घडत असताना, या विरुद्ध अधिवेशनामध्ये सुद्धा अशी तस्करी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले असताना सुद्धा, अशा गोमांसाची तस्करी करणाऱ्या आणि त्यांच्या वरती अमानुष छळ करून हत्या करणाऱ्यांना कुणाचेच भय कसे राहिले नाही असा सवाल आता संतप्त झालेले हिंदू बांधव आणि गोरक्षक करत आहेत. या सर्वांना नेमकं कुणाचं अभय आहे आणि इतकी बिनधास्तपणे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा धारिष्ट या सर्वांमध्ये येतो कुठून असा सवाल उपस्थित करत या गुन्हेगारांना तात्काळ शोधून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार तथा कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार निलेश राणे यांनी याप्रकरणी गोवंशाची हत्या आणि तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा आणावा अशी मागणी हिवाळी आणि अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने या गुन्ह्यांमध्ये सापडणाऱ्या गुन्हेगारांना मकोका लावण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रकरणी पोलीस नेमके कोणाला पकडतात आणि त्यांच्यावर हा मकोका लागतो का हे पाहणं जास्त संयुक्तिक ठरणार आहे.