उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षवाढीसाठी प्रयत्नशील : ना. उदय सामंत

 

सावंतवाडीत शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ

एक लाख सदस्य नोंदणीचा संकल्प

सावंतवाडी । प्रतिनिधी : महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना वाढवत आहेत. त्यामुळे आम्ही देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमची संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकवत असताना आपली संघटनाही वाढली पाहिजे, हीच माझी संपर्कमंत्री म्हणून भूमिका आहे, असे राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना संपर्कमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदं वगळता इतर संघटना बरखास्त करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, संजय आंग्रे, संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, यशश्री सौदागर, तालुकाप्रमुख बबन राणे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, राकेश पावसकर, सुनील डुबळे, हर्षद डेरे, अर्चना पांगम, झेवियर फर्नांडिस, चेतना गडेकर आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री सामंत म्हणाले, आजची उपस्थिती पाहून शिवसेनेची संघटना किती मजबूत आहे, हे लक्षात येते. विजयाची नांदी दोडामार्गातून आम्ही सुरू केली आहे. आमच्या ताकदीची आणि अस्तित्वाची दखल इतरांना घ्यावी लागेल, असे काम अपेक्षित आहे. सभासद नोंदणीचा एक लाखाचा संकल्प आपण केला आहे. आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महिला भगिनींची साथ आहे. त्यांची सभासद नोंदणी अधिक करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक कामे होत आहेत. मोठ्या प्रमाणात विकास निधी या भागात येत आहे. सावंतवाडी आणि कुडाळ-मालवणमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत. समन्वय समितीत झालेल्या निर्णयानुसार सर्व गोष्टी होतील, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात प्रमुख पद वगळता इतर संघटना बरखास्त करत आहोत. मान-अपमान, नवा-जुना हा वाद न करता एकसंघपणे संघटना वाढीसाठी काम करा. नितेश राणेंवर त्यांच्या पक्षाने रत्नागिरीची जबाबदारी दिली आहे, तर माझ्याकडे पक्षाने सिंधुदुर्गची जबाबदारी दिली आहे. सिंधुदुर्गची सदस्य नोंदणी राज्यात सर्वात जास्त असेल, असे काम करा. घरोघरी जाऊन नोंदणी करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले, उदय सामंत जिथे हात लावतात, तिथे सोने करतात. या मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचे काम आम्ही करू, असा विश्वास यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, अर्चित पोकळे, परीक्षित मांजरेकर, सत्यवान बांदेकर, बंटी पुरोहित, प्रतीक बांदेकर, विनायक सावंत, शुभांगी सुकी, शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते