“शिकून मोठे व्हा, आकाशाला गवसणी घाला :    स्वप्निल मेस्त्री यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

कोकण आधार प्रतिष्ठानतर्फे किंजवडे शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप 

शिरगाव (प्रतिनिधी) :    कोकण आधार प्रतिष्ठान, दिवा-ठाणे या संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. स्वप्निल मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. त्यांनी सांगितले, “शिकून मोठे व्हा, आकाशाला गवसणी घाला. पण आई-वडिलांना आणि आपल्या शाळेला कधीच विसरू नका.”

 

शुक्रवार २५ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, किंजवडे-ठाकूरवाडी येथे शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील २० गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन, लेखन साहित्य यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना गोड खाऊही देण्यात आला.

कोकण आधार प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ शैक्षणिक साहित्य वितरित करणे नाही, तर शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव विद्यार्थ्यांना जागरूक करणेही आहे. याआधी कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये विविध शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम यशस्वीरित्या पार पडले आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराव जाधव यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या भाषणांचा समावेश केला. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन श्री. महेश इंगोले यांनी केले.

यावेळी कोकण आधार प्रतिष्ठानचे संस्थापक स्वप्निल मेस्त्री,अध्यक्ष वैभव जाधव, सेक्रेटरी प्रशांत अनुभवणे, खजिनदार वसंत ठोंबरे, उपाध्यक्ष विजय गुरव, सल्लागार उमेश घोगळे, प्रशांत अपकर, राजेश परब, नरेश गोमले, नितीन जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप परब, ज्येष्ठ मार्गदर्शक उदय तळवडेकर, महिला बचत गट अध्यक्षा उर्मिला तळवडेकर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष पालवे, याप्रशालेचे मुख्याध्यापक गोविंदराव जाधव व सहाय्यक शिक्षक महेश इंगोले , विद्यार्थी आदी उपस्थित होते.