जिल्हास्तरीय प्रो कबड्डी स्पर्धेत जय गणेश मालवण व यंगस्टार कणकवली संघ विजेते

मालवण येथील भंडारी ए.सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजन

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय प्रो कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात जय गणेश मालवण संघाने तर तसेच मुलांच्या गटात यंगस्टार कणकवली संघाने विजेतेपद पटकाविले.

 

भंडारी एज्युकेशन सोसायटी संचलित भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय, मालवणच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त भंडारी एज्युकेशन सोसायटी, कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि २००६ बारावी बॅच पुरस्कृत जिल्हास्तरीय प्रो- कबड्डी स्पर्धा भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठया उत्साहात व उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. २२ वर्षाखालील मुले व मुली अशा दोन गटात हि स्पर्धा झाली. यां स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष उद्योजक तथा प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. दीपक परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. माने, मुंबईच्या माजी पोलीस एसीपी अस्मिता भोसले, कबड्डी संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष रुजारिओ पिंटो, पर्यटन व्यावसायिक सौ. अन्वेषा आचरेकर, भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटी सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, प्रा. अनिल देसाई, प्रा. पवन बांदेकर, प्राचार्य हणमंत तिवले, प्रवीणा शिंदे, प्रा. गुरूदास दळवी आदी व इतर उपस्थित होते.

 

स्पर्धेत मुलांच्या गटात १७ तर मुलींच्या गटात ११ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांच्या गटात उपविजेतेपद जय मानसीश्वर संघ तर तृतीय क्रमांक जय महाराष्ट्र सावंतवाडी आणि चतुर्थ क्रमांक भद्रकाली गुढीपूर संघाने मिळविला. यामध्ये उत्कृष्ट चढाई- ओंकार साटेलकर (सावंतवाडी), उत्कृष्ट पकड – ओंकार खाडेकर (कणकवली ), अष्टपैलू खेळाडू – भावेश मयेकर (कणकवली ) यांना गौरविण्यात आले. तर मुलींच्या गटात उपविजेतेपद एस. ए. फाउंडेशन मालवण संघाने मिळविले. तर तृतीय क्रमांक एस. एम. स्पोर्ट्स कुडाळ व चतुर्थ क्रमांक यंगस्टार कणकवली संघाने मिळविले. यामध्ये उत्कृष्ट पकड – ईशा कोचरेकर (मालवण), उत्कृष्ट चढाई पूर्वा बांदकर, (मालवण) अष्टपैलू खेळाडू- रिद्धी हडकर ( मालवण) यांना गौरविण्यात आले.

स्पर्धेसाठी पंच म्हणून मधुकर पाटील, नितीन हडकर, जेरी फर्नांडिस, दाजी रेडकर, ललित चव्हाण, रेनोल्ड बुतेलो, शैलेश नाईक, विवेक नेवाळे, कल्पेश राणे, प्रथमेश आढाव यांनी काम पाहिले.

 

विजेते व उपविजेते तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांक संघाना रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या गौरविण्यात आले. यावेळी हेमंत शिरगांवकर, अनिकेत फाटक, भूषण मेतर, ललित चव्हाण, ऍड. पलाश चव्हाण, जुबेर खान, शेखरं भगत, ओंकार यादव, भार्गव खराडे, श्रीराज बादेकर, अश्विनी वायंगणकर, स्नेहल ढोके, हेमराज सावजी, सागर जाधव, ऍड. प्रथमेश सामंत, शुभम मेस्त्री, विठ्ठल सादये, पंकज गावडे आदी व इतर उपस्थित होते. सूत्रसंचालन सौगंधराज बादेकर यांनी केले.