Winners of various competitions organized by Maharashtra Sahitya Parishad Ratnagiri branch.
मसाप आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण
मुलांना लेखनाची आवड निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच- विनायक हातखंबकर
रत्नागिरी : आता शाळेतल्या मुलाना पत्र लिहिण्याची सवय मोडली आहे. मग आपण सर्वांनी घरातील मुलांना आंतरदेशीय, पोस्टकार्ड लिहायला प्रोत्साहन द्या, ही आपली जबाबदारी आहे. कोरोना काळात माणूस माणसापासून लांब जाऊ लागला होता. पण माणसांनी एकत्र का राहिले पाहिजे, आपल्या प्रतिभेने लिखाण करून भावना व्यक्त केल्या पाहिजे, हे पुढच्या पिढीला सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ विनायक हातखंबकर यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेतर्फे कथा, कविता आणि ललित लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील विजेत्यांना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या केळकर सेमिनार हॉलमध्ये गौरवण्यात आले. त्या वेळी श्री. हातखंबकर बोलत होते. लिहिण्याकरिता आधी भरपूर वाचले पाहिजे. तुम्ही वाचत राहा, ऐका, लिहित राहा आणि त्याचे पुस्तकही प्रकाशित व्हावे याकरिता प्रेरणा घ्या. सामाजिक समस्या, मुलींचे प्रश्न, शाळांमध्ये शिकणाऱ्या कमी वयाच्या मुलांचे प्रश्न, धार्मिक तेढ हा देशासमोरचा प्रश्न आहे, जागतिकीकरणाचे काही विषय आहेत. यावर कथा, कविता लिहीता येतील. पुढील वेळ भेटताना आपण असे पुस्तक प्रकाशित केलेत तर आनंद होईल, असे श्री. हातखंबकर यांनी सांगितले.
या वेळी श्री. हातखंबकर आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सहकार्यवाह तथा रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले. मसापचे अनिल दांडेकर यांनी स्वागत आणि सूत्रसंचालन केले. काव्य स्पर्धेसाठी कोरोना काळ, कथालेखनासाठी कोरोना काळातील मानवी मनाच्या अवस्था तसेच ललित लेखनासाठी कोरोना आधी आणि नंतरचे समाजजीवन असे विषय देण्यात आले होते. यातील प्रत्येक साहित्य प्रकारामध्ये प्रथम क्रमांकासाठी १००० रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय ८०० रुपये आणि प्रमाणपत्र आणि तृतीय ५०० रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षिस देण्यात आले.
ललित लेखन स्पर्धेत प्रथम योगीनी भागवत, द्वितीय जान्हवी फडके, तृतीय सानिका तळेकर, उल्लेखनीय पारितोषिक सौ. सविता बर्वे (सर्व रत्नागिरी) यांना गौरवण्यात आले. कथा लेखन स्पर्धेत प्रथम विस्मया कुळकर्णी (रत्नागिरी), द्वितीय रुपाली पाटील (खेड), तृतीय राधा रायकर (चिपळूण) यांना बक्षीस दिले. काव्य लेखन स्पर्धेतील प्रथम निलिमा इंदुलकर (रत्नागिरी), द्वितीय रुपाली पाटील (खेड), तृतीय विनायक जोशी (चिपळूण) यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी नाटककार जयंत पवार यांच्या दोन लघुकथांचे वाचन साक्षी चाळके, सई साने व अनिल दांडेकर यांनी केले.