इन्फिगो थ्री डी आय क्लिनिकचा 1 जून रोजी लांजात शुभारंभ.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

लांजा : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचा अत्याधुनिक बाह्यरुग्ण विभाग (थ्री डी आय क्लिनिक) लांजा याठिकाणी आजपासून सुरु होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते या क्लिनिकचे उद्घाटन गुरुवार दिनांक १ जून रोजी सकाळी ९:३० वाजता होणार आहे. आमदार राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
इन्फिगो आय केअर हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील नामांकित डोळ्यांचे हॉस्पिटल आहे. महाराष्ट्राभर या हॉस्पिटलच्या विविध शहरांमध्ये शाखांची शृंखला आहे. दिवसेंदिवस हा विस्तार वाढतच आहे. या माध्यमातून अत्याधुनिक व अद्ययावत नेत्रसेवेची संधी रुग्णांना उपलब्ध केली आहे. लांजा तालुक्यातील जनतेची मागणी व गरज लक्षात घेऊन इन्फिगो ग्रुपने लांजा क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लांजात अशा सुविधेची कमतरता ओळखूनच ही अत्याधुनिक तंत्रज्ञान समृद्ध आरोग्य सुविधा याठिकाणी उपलब्ध केली गेली आहे. शहरातील शेट्ये पेट्रोल पंपासमोरील मेरिगोल्ड कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे क्लिनिक सुरू होत आहे.

या क्लिनिकमध्ये दरदिवशी नियमितपणे डोळ्यांच्या तपासणीसाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची व्यवस्था करण्यात आली आहे. आठवड्यातील दर मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी डॉक्टर्स उपलब्ध असणार आहेत. यासोबतच या क्लिनिकमध्ये १२ तास डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होणार आहे. टेली व्हिडिओ कन्सल्टन्सीद्वारे ही सुविधा अत्याधुनिक फंड्स कॅमेऱ्याने उपलब्ध करण्यात आली आहे. डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घेऊन त्याप्रमाणे या क्लिनिकमध्ये रुग्णावर उपचार केले जाणार आहेत. ही सुविधा या हॉस्पिटलने सर्वप्रथम लांजा याठिकाणीच उपलब्ध केली आहे. इन्फिगोचे सर्व डॉक्टर्स तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध शिबिरे घेऊन लोकांच्या दरवाजापर्यंत पोहोचणार आहेत. चष्म्याचा अचूक नंबर, स्वस्त दरात देशी, इम्पोर्टेड फ्रेम्स उपलब्ध राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात सुसज्ज व आधुनिक असा रेटिना विभाग इन्फिगो रत्नागिरी येथे आहे. आजवर हजारो रेटिनाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
शुभारंभ सोहोळ्याला तहसीलदार प्रमोद कदम, नगराध्यक्ष मनोहर बाईत, श्रीराम वंजारे, महंमद रखांगी, प्रसन्न शेट्ये, ॲड. अभिजित जेधे आदींसह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सामाजिक जडणघडणीमध्ये सर्वार्थाने योगदान रहावे या भूमिकेतून इन्फिगो आय केअर हॉस्पिटलने लांजामध्ये ही सुविधा निर्माण केली आहे. तरी, लांजातील या शुभारंभ सोहोळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन इन्फिगो आय केअर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.