“कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहीमेचा शुभारंभ

रत्नागिरी:राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-2 अंतर्गत गावांगावांमध्ये स्वच्छतेच्या ज्या सोयी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्याचा ग्रामस्थांनी नियमित वापर करुन आपले गाव स्वच्छ ठेवणे हा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी “कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू” या मोहीमेचा दिनांक 01 मे, 2025 रोजी रत्नागिरी तालुक्यातील पानवल ग्रामपंचायत येथे श्रीम.वैदेही रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी यांचे शुभहस्ते करण्यात आला.

त्यापुढे मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, गावातील सर्व कुटुंबातील कचऱ्याचे वर्गीकरण केले पाहीजे. तसेच कचऱ्यापासून सेंद्रीय खत तयार करुन गावातील फळझाडे व शेतीसाठी त्याचा उपयोग करुन गाव स्वच्छ व सुंदर ठेवले पाहीजे. तसेच या अभियानाची प्रचार प्रसिध्दी गावसभा घेऊन सर्व कुटुंबापर्यंत हा संदेश पोहचला पाहीजे असे त्यांनी प्रतिपादन केले.

यावेळी या अभियानाची माहिती देत असताना श्री.राहुल देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) म्हणाले की, गावातील लोकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव जागृती ‍निर्माण झाली पाहीजे. तसेच हे अभियानामध्ये गाव स्वच्छ सुंदर करुन लोकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची स्वच्छता सातत्यपूर्ण ठेवावी तसेच प्रत्येक कुटुंबातील कचऱ्याचे वर्गीकरण करुन गावातील सार्वजनिक नॅडेप खड्डा या मोहीमेत भरुन त्याचे खत निर्माण करुन ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळाले पाहीजे. जेणेकरुन ग्रामपंचायत आर्थिकदृष्‍टया संपन्न होण्यास मदत होईल असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.चेतन शेळके, विस्तार अधिकारी श्री.पी.एन.सुर्वे, जिल्हा कक्षातील सर्व सल्लागार, पानवल ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीम.तनिष्का होरंबे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच गावातील नागरीक कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावना व आभार उपसरपंच श्री.रविंद्र मांडवकर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.