कणकवली उपजिल्हा रुग्णालयात इंजेक्शन दिल्यानंतर महिलेचा मृत्यू

कणकवली :

हर्नियाच्या शस्त्रक्रियेसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या श्रेया श्रीकांत लोकरे (वय ४०, रा. कलमठ कोष्टीवाडी) यांचा शस्त्रक्रियापूर्व इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती अचानक बिघडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी सुमारे १.२० वाजण्याच्या सुमारास घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया लोकरे या काही दिवसांपूर्वी येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भरविण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिरात तपासणीसाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांची हर्नियाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार डॉ. आचरेकर यांच्या सल्ल्यानुसार त्या गुरुवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या.

 

तपासणीदरम्यान त्यांच्या बेंबीला सूज असल्याचे आढळले. दरम्यान दुपारच्या सुमारास शस्त्रक्रियापूर्व तयारीचा भाग म्हणून त्यांना इंजेक्शन देण्यात आले. मात्र इंजेक्शन दिल्यानंतर काही क्षणातच त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर रुग्णालयातील फिजिशियन डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले, परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, श्रेया लोकरे यांना काही इंजेक्शनची ऍलर्जी असल्याची बाब यापूर्वी एका खाजगी रुग्णालयात निदर्शनास आली होती. मात्र ही माहिती रुग्णालयात दाखल होताना रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली नव्हती, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ऍलर्जीची माहिती आधी दिली असती तर रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेता आली असती, असेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

 

या प्रकरणी श्रेया यांचे पती श्रीकांत दगडू लोकरे (रा. कलमठ – कोष्टीवाडी) यांच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

 

घटनेची माहिती मिळताच कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे तसेच कृष्णा कांबळी यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

 

“माझ्या आईला वाचवा…” – मुलाने फोडला हंबरडा

 

आईच्या उपचारासाठी रुग्णालयात आलेला श्रेया लोकरे यांचा १२ वर्षीय मुलगा आईच्या मृत्यूची माहिती मिळताच भावुक झाला. “माझ्या आईला वाचवा… माझ्या आईचा जीव महत्वाचा आहे…” असे म्हणत त्याने टाहो फोडला. त्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू आले.

 

निवासी वैद्यकीय अधिकारी रुग्णालयात दाखल

 

घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुबोध इंगळे तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली तसेच रुग्णाच्या नातेवाईकांशी संवाद साधला. घडल्या प्रकाराची माहिती देखील श्री. इंगळे यांनी नातेवाईकांना दिली. दरम्यान त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनही घटनेबाबत सविस्तर माहिती देखील घेतली.