अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत १२ वी मध्ये ८७.३३℅ गुण मिळवून कला शाखेत प्रथम

लांजा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संदीप तिखे याची यशोगाथा 

लांजा (प्रतिनिधी) घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ब्रीदवाक्य ध्यानी घेऊन सुट्टीच्या दिवशी काम करून व जिद्दीने अभ्यास करून १२ वी मध्ये ८७.३३℅ गुण मिळवून संदीप सुरेश तिखे याने लांजा कनिष्ठ महाविद्यालयात कला शाखेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

तालुक्यातील कणगवली गावचा सुपुत्र असलेला संदीप तिखे हा अभ्यासात हुशार आहे. त्याचे इ. १० वी पर्यंत शिक्षण हे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे झाले. त्यानंतर

न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये क. महाविद्यालय लांजा या प्रशालेत इ. १२ वी पर्यंतचे शिक्षण घेत होता. वडील शेतकरी असल्याने व‌ घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे ब्रीदवाक्य ध्यानी घेऊन स्वत: तळवडे येथील विकास डेकोरेटर्स यांच्याकडे शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टित काम करुन शिक्षणाचा खर्च केला .वेळेप्रसंगी घरी मदत केली.

त्याच चिकाटीने संदीप तिखे याने अभ्यास करून लांजा क. महाविद्यालयात इ. १२ वी कला शाखेत ८७.३३℅ गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. संदीपच्या या यशस्वी कामगिरी बाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबई अध्यक्ष डॉ.आनंद जगन्नाथ पेडणेकर व पदाधिकारी,तळवडे सरपंच सौ. रोहिणी आंबेकर,उपसरपंच प्रसाद ढेपे व ग्रामस्थ, कणगवली सरपंच श्रीम. संपदा चव्हाण व ग्रामस्थ, तळवडे विकास सोसायटी चेअरमन विजय पाटोळे, ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर व सहकारी, विकास डेकोरेटर्स चे मालक विराज विकास पाटोळे यांनी अभिनंदन केले आहे.