त्याच तेजाने, त्याच स्वाभिमान आणि भव्यतेने छत्रपती शिवरायांचा पुतळा साकार झाला!

किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना

आनंदाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने राजकोट दुमदुमला

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर, आ. रवींद्र चव्हाण, आ. निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती

अमित खोत | मालवण : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने किल्ले राजकोट रविवारी दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने आणि त्याही पेक्षा भव्यतेने राजकोट किल्यावर उभा राहिला आहे. आमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अश्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकोट किल्ल्यातील शिवपुतळ्याचे पुजन व महाआरती केल्यानंतर व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, राजकोट किल्ल्यावर दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर आमच्या सरकारने निर्धार केला. महाराजांना साजेसे स्मारक निर्माण करायचे. तो महाराजांचा पुतळा आज पुर्ण झाला आहे. विक्रमी वेळेतच पुतळा या ठिकाणी पुन्हा आम्ही प्रस्थापित केला. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनापासून अभिनंदन करतो सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री रविंद्र चव्हाण असतील किंवा आताचे मंत्री शिवेंद्रबाबा भोसले असतील यांनी अतिशय वेगानं हे काम केलं आणि त्यासोबत शिल्पकार श्री सुतार (श्री. राम सुतार, श्री. अनिल सुतार) यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारचा पुतळा तयार केलेला आहे.त्यांच्या सोबत आयआयटी चे इंजिनिअर होते. जे जे स्कुल ऑफ आर्ट्स चे प्रमुख होते. 100 वर्षे कुठल्याही वातावरणात टिकेल अशी महाराजांच्या पुतळ्याची रचना करण्यात आली आहे. असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.

राजकोट किल्ला याठिकाणी उभारण्यात आलेल्या शिवपुतळ्याचे पुजन आणि शिवआरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आम. निरंजन डावखरे, आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांतधिकारी ऐश्वर्या काळूसे, तहसीलदार वर्षा झालटे, सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गचे अभियंता मिलिंद कुलकर्णी, सावंतवाडी विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, मालवण उपविभाग सहायक अभियंता अजित पाटील, मुख्याधिकारी संतोष जिरगे, माजी आमदार अजित गोगटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर, गटविकास अधिकारी शाम चव्हाण, चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, बाबा मोंडकर, विकी तोरसकर, सूर्यकांत फणसेकर, पंढरीनाथ माने, भाजपा महिला शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, तारका चव्हाण, अमिता निव्हेकर, वैष्णवी मोंडकर, महानंदा खानोलकर, पूजा वेरलकर, दिक्षा गांवकर, अर्चना मिठबावकर, दिव्या कोचरेकर, अंजना सामंत, दादा साईल, किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, अरुण तोडणकर यांसह अन्य उपस्थित होते.

यावेळी शिल्पकार अनिल सुतार यांच्याहस्ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री यांना शिवपुतळ्याची प्रतिकृती देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबत पुतळा उभारणीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता महेंद्र किणी आणि मालवणचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते करण्यात आला.

कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिथे वादळी तुफान या ठिकाणी येतात तोक्ते वादळ असेल फयान वादळ असेल किंवा इतर जे काही वादळे या ठिकाणी आली त्या सगळ्यांच्या अभ्यास करून त्याहीपेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त तुफान आला तरी या पुतळ्याला काही होणार नाही, अशी सुरक्षा रचना आता करण्यात आलेली आहे. जवळपास 91 फुटाचा हा पुतळा आहे. बहुदा देशातला महाराजांचा सर्वात उंच पुतळा म्हणून देखील याच्याकडे पाहता येईल. दहा वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याकडे याच मेंटेनन्स देखील देण्यात आलेला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

शिवसृष्टीचेही काम लवकरच

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले,येथील आसपासचा परिसर आहे या परिसरातील जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिवसृष्टी निर्माण करण्यात येईल, जेणेकरून आलेल्या शिवभक्त पर्यटकांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अनुभव याठिकाणी मिळावा, भव्यता पाहता यावी अशा दृष्टीने आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे. त्याचे काम लवकरच आम्ही करू करणार आहोत. जमीन मालकही जमीन देण्यासाठी तयार आहेत. मंत्री नितेश राणे त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेत. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विकासात प्राथमिकता कोकणाला आहे. १४ ते १९ युतीची सत्ता असो किंवा शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात असो कोकणाला झुकतो माप देण्याचे काम हे मागील अडीच तीन वर्षातही आम्ही केलेला आहे आणि यापुढेही आमच्या सरकारची भूमिका हीच असेल की कोकणाला जास्तीत देण्याचा प्रयत्न करू आणि विशेषतः पर्यटनाच्या दृष्टीने जेवढा अधिकाधिक विकास करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचे सरकार करणार आहे, असेही शमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राज्याच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आम्ही सज्ज आणि तत्पर आहोत. असेही पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले.

आनंदाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे. दैदीप्यमान असे शौर्याचे प्रतीक असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा आहे. महाराजांच्या पद स्पर्शाने पावन अश्या या भूमीत आलेल्या प्रत्येकाला प्रेरणा, ऊर्जा मिळेल. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याहस्ते यापूर्वी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झालेले होते. आज ते या सोहळ्याला उपस्थित नसले तरीही सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ते शिवकार्यच करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रेकॉर्ड टाइममध्ये आम्ही उभा करण्याचा शब्द शिवप्रेमींना दिला होता. आणि खऱ्या अर्थाने आज पाहतोय की भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा झालेला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिल्पकार अनिल सुतार यांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यांनी देखील यामध्ये मेहनत घेतली आहे. तेव्हा रवींद्र चव्हाण होते आता शिवेंद्रराजे आहेत आणि पीडब्ल्यूडीच्या सर्व अधिकाऱ्यांनी देखील यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. सचिव मनिषा म्हैसकर यांची कमिटी होती. सर्वांनी चांगले काम केले. हातात समशेर तलवार धरून महाराज उभे आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाकडे वाईट नजरेने बघण्याची हिंमत कोणाची होणार नाही असेही शिंदे म्हणाले.

आजी सोनियाचा दिनु : मंत्री नितेश राणे

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील पूर्णाकृती पुतळा तमाम शिवभक्तांच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. प्रत्येकाला कायम प्रेरणा देत राहील. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांच्या कलाकृतीतून साकारलेला हा पुतळा शिल्पकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. जवळपास ९१ फूट उंची असलेला छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा देशातील सर्वांत उंच पुतळ्यांपैकी एक आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेतून राज्यातील महायुती सरकारने छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा उभारून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याबद्दल आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्य शासनाचे मनःपूर्वक आभार. अश्या भावना पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.