चिपळूण नगरपालिका “ॲक्शन मोडवर”

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण न.प. चा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

चिपळूण (वार्ताहर) : अतिवृष्टी व महापुराच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी या वर्षातील पावसाळ्याकरिता आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चिपळूण नगर परिषदेने जम्बो आराखडा तयार केला आहे. यामध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरू राहणार आहे. तसेच पूर प्रभावित क्षेत्र व निवारा केंद्र निश्चित करण्यात आले असून आपत्कालीन पूर परिस्थितीत फायबर होडी यांत्रिक होडी आदी साहित्य देखील सज्ज ठेवण्यात आले आहे. एकंदरीत चिपळूण नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सज्ज असणार आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

पूर प्रभावित क्षेत्र निश्चित

२३ जुलै २०२१ रोजी शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला होता. महापुरात चिपळूण नगरी उध्वस्त झाल्याने येथील नागरिकांना मोठा फटका बसला होता. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये चिपळूण नगर परिषदेतर्फे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला जातो. यामध्ये चिपळूण शहरातील बाजारपेठ भाग, पेठमाप, गोवळकोट, मुरादपूर, शंकरवाडी, मार्कंडी, चिंचनाका व वडनाका परिसर, एसटी स्टैंड, पागमळा परिसर पूर प्रभावित क्षेत्र निश्चित करण्यात आली आहेत.

आपत्कालीन कक्ष स्थापन

चिपळूण नगर परिषद कार्यालयामध्ये आपत्कालीन कक्ष स्थापन करणेत आला आहे. चिपळूण नगर परिषद कर्मचाऱ्यांचे दुरध्वनी क्रमांक एकत्रित संकलित करणेत आलेले आहेत. दिनांक १ जून २०२५ पासून नगरपरिषद कर्मचारी यांची दिर्घकालीन रजा व मुख्यालय सोडण्यात येऊ नये, याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आदेश काढणेत आले आहेत. नगर परिषद आस्थापनेवरील कर्मचारी यांची आपत्कालीन कक्षामध्ये रात्रपाळीकरीता नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. नगर परिषद हद्दीमधील पोहणाऱ्या युवकांची यादी तयार करणेत आलेली आहे. ज्यावेळी पूर परिस्थिती शहरामध्ये असते, त्यावेळी या युवकांना दुरध्वनीवरुन सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे. फायबर होडी, लाईफ जॅकेटसह रबरी ट्यूब, बोये, दोरी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नगर परिषदेकडे लाईफ जॅकेट नग १२०, रबरी ट्युब नग १०, बोये नग ११०, दोरी बंडल नग १७ इत्यादी साहित्य आहे. सदर साहित्य नागरीक व संस्था यांचेसाठी १४ प्रभागात देण्यात आले आहे. आपत्कालीन पूर परिस्थितीत नगर पालिकेच्या ४ यांत्रिक फायबर होडी व २ भाडे तत्वावर घेण्यात आलेल्या आहेत अशा ६ बोटी उपलब्ध आहेत. तसेच नगर परिषदेच्या बिगर यांत्रिक होडी ५ उपलब्ध आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून काही बचाव साहित्य प्राप्त आहेत.

भोंगा वाजणार

शहरामध्ये पाणी भरण्यास सुरुवात होते, त्यावेळेस सावधानतेचा इशारा म्हणून नगर परिषद कार्यालयामधून भोंगा वाजविण्यात येतो. शहरातील महत्त्वाच्या ७ ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेत आलेली असून पाण्याच्या पातळीबाबत नियंत्रण कक्षामध्ये त्याबाबत माहिती देण्यात येणार आहे. चिपळूण शहरामध्ये पावसाळी पाणी वाहून जाणेसाठी एकूण १७ किमी लांबीचे पन्हे असून ते जेसीबी मशिनने खोदाई व सफाई करणेत आलेली आहे. ज्याठिकाणी मशिन जाऊ शकत नाही, त्याठिकाणी सफाई कामगारांकडून साफसफाई केलेली आहे. गटारे व नालेमधून पाणी वाहण्यास पाण्याच्या प्रवाहाला विरोध व अडथळा होणारे, सार्वजनिक जागेवरील प्लॅस्टिक, कपडा, झाडांची पाने, झुडूपे काढून सांडपाणी निचरा होणेसाठी साफसफाई करणेत आलेली आहे.